गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अंधेरी परिसरात पाळीव मांजरीला ठार मारल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मांजराची मालकीण अनुराधा चौधरी (५५) यांनी ओशिवरा पोलिसात तक्रार दिली आहे.
चौधरी या अंधेरी पश्चिमच्या इंद्रदर्शन फेज या ठिकाणी राहत असून फार्मा व्यावसायिक आहेत. त्यांच्या घरात त्यांनी एकूण ६ मांजरी पाळल्या असून त्यांची देखभाल त्याच करतात. चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सहा पाळीव मांजरीपैकी लिमा नावाचे स्त्री तर ओशन नावाचे पुरुष जातीचे मांजर २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान हरवले होते. त्यापैकी ओशन हे मांजर १ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चौधरी यांना बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांनी त्या मांजराला तातडीने प्राण्यांच्या दवाखान्यात नेले. त्यानंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास ते मांजर मयत झाले. चौधरी यांनी ओशनचा अंत्यविधी उरकला आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्याच्या विरोधात तक्रार दिली. ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी संबंधित कलमा अंतर्गत अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.