ठाणे - एनसीबीमध्ये असताना धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत आलेले आणि नंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले समीर वानखेडे यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. आधी एनसीबीमधून बदली झाल्यानंतर आता बारच्या लायसनवरून समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात सापडला आहे. वय लपवून बार लायनस बनवल्या प्रकरणी समीर वानखेंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलीस ठाण्यामध्ये समीर वानखेडे यांच्याविरोधात षडयंत्र, फसवणूक, शपथेवर खोटी माहिती देणे आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर वानखेडे यांच्याविरोधात २१ वर्षे पूर्ण नसताना वाशीतील सद्गुरू बिअर बारचा परवाना मिळवून फसवणूक केल्याबद्दल उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सत्यवान गोगावले यांच्या तक्रारीनुसार आयपीसी कलम १८१, १८८ ,४२०, ४६५, ४६८ व ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याकडे नवी मुंबईमध्ये एक बार असल्याचा आणि त्यांना कमी वयात या बारचं लायसन्स मिळालं होतं, असा दावा केला होता. समीर वानखेडे यांना १७ वर्षांचे असताना नवी मुंबईतील हॉटेल सद्गुरू मध्ये बारसाठी लायसन मिळाले होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.
प्राथमिक तपासामध्ये समीर वानखेडे यांना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी एक बाप आणि रेस्टॉरंटसाठी परवाना मिळाला होता. त्यावेळी समीर वानखेडे यांचे वय १७ वर्षे होते. तर बारचा परवाना मिळवण्यासाठी किमाय २१ वर्षे ही वयोमर्यादा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या बार आणि रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला होता.