वर्धा- प्रियकराला भेटायला का गेली होती, असे घरच्यांनी म्हणताच युवतीने घरीच फिनेल प्राशन केले. घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती युवती चार महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती घरच्यांना दिली. अखेर पीडितेने याबाबतची तक्रार आर्वी पोलिसात दिली. पोलिसांनी पीडितेच्या मानलेल्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
१८ वर्षीय मुलीचे तिच्या मामीच्या मानलेल्या भावासोबत प्रेमसंबंध जुळले. जानेवारी महिन्यात पीडिता आर्वी तालुक्यातील एका गावात त्याला भेटायला गेली. तेथे आरोपी युवकाने पीडितेशी जवळीक निर्माण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच त्यानंतरही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ९ जून रोजी रात्रीच्या सुमारास पीडितेच्या घरच्यांनी तिला तू त्याला भेटायला का गेली, असे म्हटले असता पीडितेने रागाच्या भरात १० जून रोजी सकाळच्या सुमारास बाथरुममध्ये फिनेल प्राशन केले.
घरच्यांना ही बाब समजताच त्यांनी तरुणीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर पीडिता ही चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितल्याने घरच्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. पीडिता ही अल्पवयीन असल्याने याबाबत आर्वी पोलीस ठाणे गाठून आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.