मीरारोड -
मुलीच्या मालकीची सदनिका सावत्र आईला बनावट कागदपत्रे बनवून विकणाऱ्या बापा सह त्याच्या साथीदारा विरुद्ध मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
दिव्या बलाणी हिच्या वतीने वकील सुनील सोनकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार , मीरारोडच्या ब्रॉडवे एव्हेन्यू मध्ये महिमा बलाणी यांची असलेली सदनिका त्यांच्या निधन नंतर पती अविनाश ह्याने ३० लाखांना विकली होती . त्यातील ५० टक्के हिस्सा हा अविनाश व ५० टक्के हिस्सा मुलगी दिव्या हीचा होता . अविनाशने स्वतःचे कर्ज व देणी यात १५ लाख खर्च केले तर उर्वरित १५ लाखातून शांती नगर सेक्टर ६ मधील दीपक इमारतीत २०१ क्रमांकाची सदनिका स्वतःचे नावे खरेदी केली . दरम्यान अविनाश ह्याने डॉली उर्फ प्रिया नावाच्या महिलेशी दुसरा विवाह केला पण २ वर्षांनी त्यांच्या बेबनाव होऊन तिने कौटुंबिक हिंसाचार नुसार फौजदारी कारवाई सुरु केली .
नालासोपाराच्या शक्कर मोहल्ला येथे राहणारा अशिक शेख याने त्यावेळी अल्पवयीन असलेल्या दिव्या साठी २०१७ सालात न्यायालयातील भरणपोषण दाव्यासाठी वकील सोनकर यांची नियुक्ती केली होती . २०१७ साली दिव्या हिने वडिलांना पाठवलेल्या नोटीस नंतर वडिलांनी ती सदनिका दिव्या हिच्या ५० टक्के हिश्यातून भविष्यातील तिचे शिक्षण , मूलभूत गरज , विवाह आदी साठी आर्थिक तजवीज म्हणून खरेदी केली होती . तसे चुकदुरुस्ती दस्त सुद्धा अविनाश यांनी नोंदणी करून दिले होते.
दरम्यान अविनाश व डॉली मध्ये समझोता होऊन दीपक इमारतीतच ३०१ क्रमांकाची सदनिका डॉली यांना देण्याचे अविनाश याने मान्य केले . परंतु अविनाश ने दिव्या हिची २०१ क्रमांकाची सदनिका डॉली हिला १० लाखांना विक्रीचे दस्त नोंदणी करून घेतले . गृहनिर्माण संस्थेत ती सदनिका डॉली यांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी वकील राजेशकुमार मिश्रा यांनी दिव्या व अशिक शेख मार्फत नाहरकत पत्र अविनाशच्या संगनमताने दिले. खोटी कागदपत्रे, खोटे पुरावे व कट करून फसवणूक केल्या प्रकरणी नया नगर पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी अविनाश सह शेख वर गुन्हा दाखल केला आहे .