लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : तुमच्यावर ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करतो, असे धमकावून गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजारांच्या लाचेची मागणी करणारे नौपाडा पोलिस ठाण्याचे हवालदार दिलीप माळवे यांच्याविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा त्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावर दाखल केला आहे. पुढील तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) करीत आहे.
तक्रारदाराच्या विरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज आला होता. त्यातील अर्जदाराला दुकान भाड्याने देत असल्याचे तक्रारदाराने खोटे सांगून तीन लाख ७५ हजार रुपये घेतल्याची तक्रार दिली होती. त्याची चौकशी नौपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार दिलीप माळवे यांच्याकडे होती. चौकशीदरम्यान माळवे यांनी तक्रारदाराला ‘तुमच्यावर ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करतो, असे धमकावून गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजारांची मागणी केली.
दरम्यान, तक्रारदाराने ठाणे एसीबीकडे धाव घेत तेथे तक्रार केली. त्यानुसार २३ नोव्हेंबर २०२२ रोजी पडताळणी केली असता, पोलिस हवालदार माळवे यांनी तक्रारदाराकडे २५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे पोलिस हवालदार माळवे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे (संशोधन २०१८) कलम ७ प्रमाणे नौपाड्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती एसीबी विभागाने दिली.