रत्नागिरी - शहरातील हिंदू कॉलनी येथे १६ वर्षीय युवतीला गेली २ वर्ष वारंवार त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माय-लेकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी २२ मार्च रोजी रात्री १०.३५ च्या सुमारास घडली. संजय यादव आणि त्याची आई सुवर्णा यादव हे दोघेही मूळचे पाली इथले रहिवासी असून ते सध्या हिंदू कॉलनीतले असून ते संशयित आहेत.
पीडित मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, २०२३ पासून ते अद्यापपर्यंत संजय यादव हा पीडितेला वारंवार त्रास देत होता. तू माझ्याकडे राहिली नाहीस तर मी तुला ठार मारून टाकीन आणि मी आत्महत्या करेन. तू पालीला आपल्या आईकडे गेलीस तर तुझ्या आई वडिलांना आणि भावाला मारेन अशी धमकी देऊन मारहाण करायचा. संजयची आई सुवर्णा यादव ही पीडितेला घरातील भांडी घासण्याची वैगेरे कामे सांगत असे असा आरोप आहे.
त्याशिवाय जर पीडितेने ते काम करण्यास नकार दिला तर तिला मारहाण करायचे. या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून आपल्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली असं पीडित युवतीच्या आईने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील करत आहेत. आत्महत्या प्रकरणाला मिळालेल्या या कलाटणीमुळे सर्वत्र याच विषयाची चर्चा सुरू आहे.