मुंबई : गेल्या काही दिवसांत बॉम्बस्फोटाच्या कॉलचे सत्र सुरूच आहे. यातच वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना थेट अनोळखी व्यक्तीने कॉल करून मीरा भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असून पोलीस पाठवा, असा कॉल केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबईपोलिसांसह मीरा भाईंदर पोलीस अधिक तपास करत आहे. आरोपीने आपण आमदार यशवंत माने असून मिरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ फेब्रूवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास प्रवीण पडवळ यांना अनोळखी व्यक्तीने कॉल केला. तसेच, "तो आमदार यशवंत माने बोलत असल्याचे सांगून मीरा भाईंदर येथे बॉम्ब स्फोट होणार असून तात्काळ पोलीस पाठवा" असे म्हटले होते. यासंदर्भात अधिक विचारणा करताच, त्याने माहिती न देता शिवीगाळ केली होती. तसेच याबाबत सतत कॉल सुरु होते.
पडवळ यांनी तात्काळ याबाबत पोलीस नियंत्रण कक्ष आणि मीरा भाईंदर येथील नियंत्रण कक्षास माहिती दिली. तसेच, याबाबत गुन्हे शाखेलाही माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच नियंत्रण कक्षातूनही त्याला कॉल केले. मात्र त्याच फोन सतत व्यस्त येत होता. या कॉलनंतर मीरा भाईंदर येथील महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने(सीआययू) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीआययू याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. आमदार यशवंत माने यांचा मोबाईल क्रमांकावरून आल्याचे भासवण्यात आले होते. त्यासाठी आरोपीने तंत्रज्ञानाची मदत घेतल्याचा संशय आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.