श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : बाजार समितीच्या सचिवपदाचा पदभाराची न्यायालयीन लढाई आता गुद्द्यावर आली आहे. सचिवपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी आलेल्या किशोर काळे यांना प्रभारी सचिवांसह त्यांच्या साथीदारांनी मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सचिव काळे यांच्या फिर्यादीवरून प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्यासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. समितीच्या सचिव पदांनी कार्यभार वाबळे यांच्याकडे असून जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार तो काळेंकडे देण्यात येणार आहे. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू आहेत. मंगळवारी समितीमध्ये पदभार स्वीकारण्यासाठी गेलो असता वाबळे यांच्यासह १० ते १२ जण तेथे आले. त्यांनी लाथाबुक्क्यांनी, तसेच हॉकीस्टीकने जबर मारहाण केली. पुन्हा पदभार स्वीकारण्यासाठी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. समवेत असलेल्या कैलास भनगे या मित्राला ही मारहाण करण्यात आली, असे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
आपण २००४ ते २०१२ या काळात सचिव पदावर कार्यरत होतो. मात्र दत्तात्रय तुकाराम कचरे (रा. खोकर) यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे कामकाज संबंधी तक्रार केली होती. त्यावरून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशी दरम्यान सचिवपदाचा कार्यभार कांदा विभागाचे प्रमुख साहेबराव वाबळे यांच्याकडे देण्यात आला. चौकशीत ठेवण्यात आलेल्या आरोपांविरूद्ध नाशिक येथील विभागीय सह निबंधकांकडे दाद मागितली. तेथे आपल्या बाजूने निकाल देण्यात आला. पणनमंत्री यांनीही तो आदेश कायम ठेवला. त्यानुसार पदभार स्वीकारण्यासाठी गेलो, असे ही मारहाण झाली, असे काळे यांनी सांगितले.