लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: येथील अपना घर फेज ३ संकुलाच्या बांधकामा ठिकाणी लोखंडी अँगल पडून ४ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूस तसेच ६ वर्षाच्या मुलास गंभीर जखमी होण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी कंत्राटदार महेंद्र कोठारी वर महिन्या भरा नंतर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मीरारोडच्या विनय नगर जवळ सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अपना घर फेज ३ संकुलाचे बांधकाम सुरु आहे. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीचा हा बांधकाम प्रकल्प आहे. ३ सप्टेंबर रोजी बांधकाम ठिकाणी लोखंडी अँगल डोक्यावर पडून ४ वर्षांच्या सुभो सुधांशू दास ह्या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. तर त्याच्या सोबत असलेला ६ वर्षांचा जयंत उर्फ जयंतो बच्चन दास हा गंभीर जखमी झाला होता. ही दोन्ही मुले बांधकाम ठिकाणी खेळत होती.
या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात घटना घडल्याच्या एक महिन्या नंतर म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना व खबरदारी घेण्यात आली नव्हती. जेणेकरून ४ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूस तसेच ६ वर्षाच्या मुलाच्या गंभीर जखमी होण्यास कारणीभूत म्हणून कंत्राटदार मे. कोठारी लँड डेव्हलपर्स प्रा. लि. चे महेंद्र कोठारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अजून कोठारी याला अटक केलेली नाही.
विशेष म्हणजे या आधी नवघर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात पोलिसांनी महेंद्र कोठारी याला काही वर्ष अटक केली नसल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांवर टीकेची झोड उठली होती.