नवी मुंबई - पोलिसांनी तळोजा येथून जप्त केलेले सुमारे ८० हजार किलो मांस गोमांस असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार सुमारे दिड कोटी रुपयांच्या या गोमांस प्रकरणी कोल्ड स्टोरेज चालक व मॅनेजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा येथील सिबा इंटरनॅशनल कोल्ड स्टोरेजमध्ये गोमांस साठवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे जून महिन्यात पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला होता. यात दोन कंटेनरमध्ये सुमारे ८० हजार किलो मांस आढळून आले होते. हे मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, हे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला आहे. यात ते गोमांस असल्याचे स्पष्ट होताच गुरुवारी तळोजा पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कोल्ड स्टोरेज मालक व मॅनेजर यांचा समावेश आहे. हे गोमांस दिल्ली येथील अल मेहफुज अॅग्रो फूड्स कंपनीच्या नावे मुंबईतून पाठवले जाणार होते. तत्पूर्वीच पोलिसांना त्याची माहिती मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेवरून औद्योगिक क्षेत्रातील कोल्ड स्टोरेजमध्ये चालणारी गैर कृत्ये समोर आली आहेत.