भिवंडी: भिवंडीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अवैद्य धंद्यांबरोबरच अवैध पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी परिमंडळातील सहाही पोलीस ठाण्यांना दिल्या नंतर कोनगाव पोलिसांनी पिस्तूल सह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका इसमास मंगळवारी सापळा असून अटक केली आहे.
शहजाद हिरा खान वय ४५ वर्ष रा. एपीएमसी भाजी मार्केट वाशी मूळ रा. उत्तरप्रदेश असे देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काढतूस प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने भिवंडी कल्याण मार्गावरील गोवेगाव येथील जय मल्हार हॉटेलच्या पाठीमागे तो पिस्तूल व काडतूस घेऊन येणार असल्याची खबर कोनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांना मिळाली. त्यांनी सदर बाब कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांना दिली. यानंतर जय मल्हार हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत कोनगाव पोलिसांनी सापळा रचला असता तेथे शहजाद देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस घेऊन आला. त्यावेळी त्याला कोनगाव पोलिसांनी अटक केली.
शहजादकडून ६५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व ६५० रुपये किमतीचे दोन जिवंत पितळी काडतूत असे ६५ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल कोनगाव पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई कोनगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक दीप बने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील,पोलीस हवालदार अरविंद गोरले, मधुकर गोडसरे, पोलीस नाईक अमोल गोरे, गणेश चोरगे, नरेंद्र पाटील, हेमराज पाटील, पोलीस शिपाई हेमंत खडसरे, रमाकांत साळुंखे यांच्या पथकाने केली आहे.