सहारनपूर - उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथं एक उद्योगपती आणि त्याची पत्नी दोघांनी गंगा नदीत उडून मारून आत्महत्या केली आहे. हे दोघेही बाईकवरून हरिद्वारला पोहचले त्याठिकाणी एक सेल्फी घेतली मग सुसाईड नोटसह दोघांचा सेल्फी मित्राला त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवला. त्यानंतर दोघांनी नदीत उडी मारली. पोलिसांनी यात पतीचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवला आहे तर पत्नीचा मृतदेह अजून शोधला जात आहे.
जोडप्याने जीवन प्रवास संपवताना सुसाईड नोट लिहिली होती, त्यात दोघेही कर्जामुळे त्रस्त होते. कर्जाला वैतागून हे टोकाचं पाऊल दोघांनी उचलल्याचं समोर आले. आमची जी संपत्ती आहे ती आमच्या २ मुलांना द्या. आमच्या मुलांचा सांभाळ आजी आजोबा करतील कारण आम्हाला इतर कुणावरही विश्वास नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सराफा व्यापारी सौरभ बब्बर होता. त्याच्या पत्नीचं नाव मोना बब्बर होते. घटनेच्या दिवशी १० ऑगस्टला हे दोघे १०० किमी अंतर बाईकनं कापत हरिद्वारला पोहचले होते. त्याठिकाणी दोघांनी अखेरचा सेल्फी घेतला. त्यानंतर सुसाईड नोट आणि सेल्फी मित्राला पाठवला.
ज्या मित्राला सेल्फी आणि सुसाईड नोट पाठवली त्याने लगेच ती शेअर करत सौरभ बब्बरच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर ते तातडीने पोलीस ठाण्यात गेले. सौरभ आणि मोनाला शोधण्याचा प्रयत्न झाला. अथक प्रयत्नानंतर हरिद्वारच्या गंगा नहर इथं सौरभचा मृतदेह सापडला मात्र पत्नी मोना बब्बरचा मृतदेह अद्याप सापडला नाही. पोलीस तिच्या मृतदेहाचा शोध घेत आहे. सौरभवर कोट्यवधीचं कर्ज होतं. व्याजामुळे तो त्रस्त झाला होता. त्यामुळे वैतागून त्याने पत्नीसोबत मिळून आत्महत्या केली.
सौरभचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमोर्टमनंतर कुटुंबाच्या स्वाधीन केला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता पोलीस त्याच्या पत्नीचा मृतदेह शोधत आहेत. कुटुंबाने सांगितले की, सौरभ आणि मोना यांचं १८ वर्षापूर्वी लग्न झालं होते. या दोघांना २ मुले आहेत. मोठी मुलगी १२ वर्ष आणि मुलगा ७ वर्षाचा आहे जो दिव्यांग आहे. सौरभ किशनपुरा मार्केटमध्ये ज्वेलरीचं काम करायचा.
मृत्यूपूर्वी घरच्यांना शेवटचा कॉल
व्यवसायात होणारं नुकसान आणि कर्जाची देणी यामुळे सौरभ वैतागला होता. त्याच्याकडे पैसै नव्हते आणि कर्ज पुरवठादार सातत्याने पैशाची मागणी करत होते. या सर्व गोष्टीला कंटाळून तो पत्नीसह बाईकवरून १०० किमी दूर सहारनपूरपासून हरिद्वारला गेला तिथे या दोघांनी नदीत उडी घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी सौरभचं घरच्यांसोबत शेवटचं बोलणं झाल्याचंही माहिती समोर आली आहे.