खेड - सिंधुदुर्गातील एका तरुणाने जंगलात मृतदेह असल्याचे स्वप्न पडल्याचे पोलिसांना सांगताच खेड पोलिसांनी बुधवारी सायंकाळी भोस्ते घाटात शोध घेतला. या शोध मोहिमेत पोलिसांना चक्क एका पुरुषाचा सापळा आणि कवटी, तसेच झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी सापडली आहे.
या प्रकारानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, ही आत्महत्या आहे की घातपात, याचा शोध आता खेड पोलीस घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव - सावंतवाडी येथील योगेश पिंपळ आर्या (३०) हे १७ सप्टेंबर २०२४ रोजी खेड पोलीस स्थानकात आले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, ‘मला वारंवार स्वप्न पडतात. खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे अशी माहिती आर्या यांनी पोलिसांना दिली.
योगेश आर्या यांच्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत मुंबई - गोवा महामार्गावरील वेरळ गावातील भोस्ते घाटाच्या डोंगरात एक किलोमीटर अंतरावर जंगलमय भागाची पाहणी केली. या पाहणीत जंगलातील एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलिसांनी जवळ पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्ट्या बांधून त्याला टॉवेलने बांधून गळफास घेऊन अनोळखी व्यक्तीचे प्रेत जमिनीवर पडलेले दिसले. त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट आणि या पोशाखाच्या आत मानवी हाडे दिसली. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली सॅक सापडली. मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ ए.आय.आर कंपनीचे काळ्या रंगाचे बूट सापडले. याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाच फुटांवर कवटी
पोलिसांना जंगलमय भागात सापडलेल्या मृतदेहापासून ५ फुटांवर एक कवटी सापडली आहे. तसेच मृतदेहाजवळ सापडलेल्या सॅकमध्ये पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडलेले नाहीत. ही मानवी हाडे आणि कवटी कोणाची आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान खेड पोलिसांसमोर आहे.
मोबाईल टास्कमुळे मृत्यू?
दरम्यान, जबाब नोंदवणाऱ्या योगेशच्या इन्स्टा अकाऊंटवर मृत व्यक्तीबाबत वेगवेगळ्या पोस्ट झाल्याचं आढळलं आहे. व्हिडिओत अनेकवेळा टास्कचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईल गेममुळे हा मृत्यू झालाय का याबाबत पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणी २ तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.