लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पाच कोटी रुपये रोख आणि जमिनीचा ५० टक्के हिस्सा देण्यासाठी दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या छोट्या शकीलच्या नावाने धमकावल्याचा प्रकार डोंगरी येथील एका व्यावसायिकाबाबत घडला आहे. या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात छोटा शकीलसह त्याचा मेव्हणा आरिफ भाईजान आणि बांधकाम व्यावसायिक जयेश शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंगरीतील ४५ वर्षीय तक्रारदार व्यावसायिकाचे चोर बाजार येथे भागीदारीत जुन्या वस्तू विकण्याचे दुकान आहे. जुन्या पुरातन वस्तूंच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांतून त्यांनी २००६-०७ पासून जमिनी आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. ऑगस्ट २०१२ मध्ये त्यांनी मिरा रोड, नवघर परिसरात साडे पाच एकर जमीन चार कोटी रुपयांना विकत घेतली. व्यवहारानंतर जमिनीच्या संबंधाने मूळ मालकांनी जयेश शहा व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काही कागदोपत्री व्यवहार केल्याबाबत समजले. त्यामुळे त्यांनी शहा यांच्याशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून काहीच हाती न लागल्याने त्यांनी जमीन विकण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये मिरा रोडमधील इस्टेट एजंट श्याम ओझा याने आरिफ भाईजानशी भेट घालून दिली. आरिफ छोटा शकीलचा मेहुणा असल्याचे समजताच ते घाबरले.
आरिफच्या अटकेनंतर... आरिफने जमिनीचे पेपर घेत पुन्हा बोलावून वाद मिटविण्यासाठी जयेश शहा याला पाच कोटी रोख आणि ५० हजार चाैरस फूट जागा देण्यास सांगितले. व्यावसायिकाने नकार देताच छोटा शकीलच्या नावाने त्यास धमकाविले. एनआयएने आरिफला अटक केल्यावर तक्रारदारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.