नवी दिल्ली - दिल्लीतील एका गर्भवती महिलेला गोळी घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मोठमोठ्या आवाजात डिजे वाजवण्यास विरोध केल्यानं आरोपीने गर्भवती महिलेवर गोळीबार केला. या गोळीबारात जखमी महिलेचा गर्भपात झाला. या महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून २ आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशीरा दिल्लीच्या सिरसपूर परिसरात ही घटना घडली. रात्री १२.१५ वाजता पोलिसांना पीसीआर कॉल आला. ज्यात सिरसपूर येथे गोळीबाराची घटना झाली आहे असं सांगण्यात आले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी सिरसपूर भागात राहणारी महिला रंजू जखमी अवस्थेत पाहिले. तिला शालीमार बाग येथील मॅक्स रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिच्या गळ्याला गोळी लागल्याने ती जबाब देण्याच्या स्थितीत नाही.
पीडिता रंजूची प्रकृती चिंताजनक असल्याने पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी दुसऱ्या महिलेचा जबाब नोंदवला. या महिलेने पोलिसांना सांगितले की, रविवारी रात्री उशिरा त्यांच्या शेजारील हरिशच्या मुलाचा काही समारंभ होता. बाळाच्या जन्मानंतर विहिरीचं पूजन केले जाते अशी प्रथा आहे. त्यावेळी महिला गीत गात विहिरीजवळ जाऊन पूजन करतात. त्यावेळी आई आणि बाळाला पाण्याने आंघोळ घालून नवीन कपडे घातले जातात. या कार्यक्रमावेळी मोठ्या आवाजात डिजे लावण्यात आला होता. त्या आवाजाचा त्रास झाल्याने रंजू तिच्या बाल्कनीत आली आणि तिने डिजे बंद करण्यास सांगितले.
डिजे बंद करण्यावरून रंजू आणि हरिश यांच्यात वाद झाला. हरिशचा राग अनावर झाला त्याने मित्राकडील बंदूक घेऊन फायरिंग केली. ही गोळी रंजूला लागली. गोळी लागल्यानंतर तातडीने रंजूला हॉस्पिटलला नेण्यात आले. तिच्या गळ्यावर गोळी लागली होती. रंजू गर्भवती असल्याने या घटनेत तिचा गर्भपात झाला. सध्या तिची अवस्थाही गंभीर आहे. तिच्यावर याआधी अनेक सर्जरी करण्यात आल्या आहेत. रंजूला याआधी ३ मुले आहेत.
आरोपीसह मित्रालाही अटकया प्रकरणात पोलिसांनी हरिशसह त्याचा मित्र अमितला अटक केली. दोघांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीमध्ये एक हरिश डिलीवरी बॉय आहे. तर दुसरा अमित मोबाईलच्या दुकानात काम करतो. गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचा पती मजूर आहे. रंजूचे कुटुंब मूळचे बिहारचे राहणारे आहे. दिल्लीत ते भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते.