लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने नौदल परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी आहे. मात्र, अलीकडेच आयएनएस शिखरा परिसरात ड्रोन उडविण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी नौदल सुरक्षा अधिकाऱ्याने कुलाबा पोलिसात तक्रार दिल्यावर ड्रोन उडविणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आयएनएस शिखरा परिसरात सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या प्रदीपसिंग रावत यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजता नौदलाच्या टेहळणी बुरुजाजवळ एक अनोळखी ड्रोन सुमारे ८० ते ९० मीटर उंचीवरून समुद्राच्या दिशेने कुठेही न थांबता वेगाने निघून गेला. यावेळी प्रशांत कुमार हे नौदलाचे कर्मचारी त्या ठिकाणी हजर होते. त्यानुसार या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट हर्षद चौगुले यांना दिली.
तेव्हा त्यांनी मुकेश मिल या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उत्तर मिळाले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे साडेसहाच्या सुमारास मुकेश मिलमधील सीता फिल्मचे प्रशासकीय व्यवस्थापक रवींद्र यांना विचारल्यावर मिलमध्ये रात्री शूटिंग चालू होते, त्यावेळी त्यांनी ड्रोन उडविल्याचे उघड झाले; परंतु त्यानंतर ते तत्काळ बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंद करत लेखी पत्र दिल्यानंतर रावत यांनी कुलाबा पोलिसात धाव घेतली. आम्हाला तक्रार मिळाल्यानंतर आम्ही त्याप्रकरणी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही, असे कुलाबा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय हातीसकर यांनी सांगितले.