धुळे : बोराडी ता.शिरपूर येथून चोरीस गेलेले पिकअप व्हॅन गुजरात पासिंग बनावट नंबर टाकून मध्य प्रदेशाच्या सीमेजवळ फिरविले जात असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ते वाहन शिताफीने पकडले. पोलिस येत असल्याचे लक्षात येताच चोरटा पसार झाला. पोलिसांनी दीड लाखांची व्हॅन ताब्यात घेतली.
शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील जयंतीराम नारायणराम चौधरी यांची एमएच १८ बीजी ०२७० क्रमांकाची पिकअप चोरट्याने ६ फेब्रुवारी २०२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पळविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरपूर तालुक्यात मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात चारचाकी वाहन चोरीच्या घटना घडत असल्याने चोरट्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमाेर उभे ठाकले होते. सीमावर्ती भागात शोध सुरू असताना चाेरलेले पिकअप व्हॅन जीजे ०९ झेड ७५७० क्रमांकाचा बनावट नंबर प्लेट लावून फिरविली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार मध्यप्रदेश गुजरात राज्याचे सीमावर्ती गाव कालियाबाब (ता. भावरा, जि. अलिजापूर) येथे पथकाने छापा टाकला. पोलिस येत असल्याची माहिती मिळताच संशयिताने पळ काढला. पोलिसांनी दीड लाखांची पिकअप व्हॅन जप्त केली. फरार झालेल्या चोरट्याचा शोध पोलिसांकडून सुरू झाला आहे.