कोलकातामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कपडे वाळत घालण्याच्या किरकोळ वादातून मोठ्या भावानं आपल्याच लहान भावाची हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. कोलकाता एअरपोर्ट जवळील विद्यासागर पल्ली परिसरात हा प्रकार घडला आहे. मृत पावलेल्या तरुणाचं नाव गोपाल मंडल असं असून त्याचा मोठा भाऊ कृष्ण मंडल याचा मुलगा ऋतिक आणि पत्नी पूर्णिमा व मुलगी प्रियासोबत वाद झाला होता. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं आणि गोपाल मंडलच्या पत्नीला भर रस्त्यात वाईट पद्धतीनं मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोपालनं मारहाणीला विरोध केला यातून वाद वाढतच गेला आणि होत्याचं नव्हतं झालं.
नेमकं काय घडलं?कथित घटनेनुसार कृष्ण आणि त्याच्या मुलाने गोपालला त्याच्या मोठ्या भावाकडून भर रस्त्यात लाथेनं मारहाण केली. शेजाऱ्यांनी गोपालला वाचवलं. गंभीर जखमी झालेल्या गोपलाला व्हीआयपी रोडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्याला मृतं घोषित केलं. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक लोकांनी आरोपी कृष्णाच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचली. पोलिसांनी चार आरोपांना अटक केली आहे. यात भक्त कृष्ण मंडल, अनिमा मंडल, प्रिया मंडल आणि ऋतिक मंडल यांचा समावेश आहे.
भावंडांमध्ये नेहमी वादसमोर आलेल्या माहितीनुसार घरात टॉवर लावण्याच्या मुद्द्यावरुन दोन भावांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. घरात नेहमीच छोट्या-मोठ्या कारणांवरुन भांडणं होत असत. अनेकदा शेजाऱ्यांना हस्तक्षेप करुन भांडण सोडवावं लागायचं. पण सोमवारी जे घडलं त्यानं संपूर्ण परिसर सुन्न झाला. कपडे वाळत घालण्याचा वाद एका भावाच्या जीवावर बेतला.
शेजाऱ्यांनी केली कठोर कारवाईची मागणीकृष्णा मंडल याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी शेजाऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी आरोपींना सोडलं तर आम्ही मंडल कुटुंबीयांना परिसरात येऊ देणार नाही अशी भूमिका आता शेजाऱ्यांनी घेतली आहे. "मंडल कुटुंबीयांमध्ये नेहमीच वाद होत होते. आम्ही अनेकदा मध्यस्थी करुन वाद सोडवण्याचा प्रयत्न देखील केला आहे. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा नवं कारण आणि त्यावरुन भांडण सुरू व्हायचं. पण त्यादिवशी जोरदार भांडण झालं. कृष्णा मंडल आपल्याच लहान भावाला अतिशय वाईट पद्धतीनं जमीनीवर आपटत होता. आम्ही हस्तक्षेप करेपर्यंत खूप उशीर झाला होता. गोपालला वाचवता आलं नाही. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी", असं एका शेजाऱ्यानं म्हटलं आहे.