मुंबई : ग्राहकांकडून दागिने घेऊन ते गहाण ठेवत त्या बदल्यात व्याजावर पैसे देणाऱ्या ज्वेलर्सने दागिन्यांसकट पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कफ परेड परिसरात माँ गोल्ड ज्वेलर्स नावाचे दुकान आहे.
जनार्दन नांदगांवकर (५३) यांनी गावी घर बांधायचे असल्याने माँ गोल्ड ज्वेलर्सचे मालक श्रवण प्रजापती (३२) यांच्याकडे ६ ऑगस्ट २०१९ रोजी पत्नीचे १९ तोळे सोने गहाण ठेवले होते. ते खासगी कंपनीत नोकरीस आहेत. दागिने गहाण ठेवल्याच्या बदल्यात ज्वेलर्सकडून नांदगांवकर यांनी दरमहा दीड टक्के व्याजाने चार लाख रुपये घेतले होते. ते व्याज चुकते करत होते.
फेब्रुवारीपासून मात्र दुकान वेळोवेळी बंद असल्याचे निदर्शनास येऊ लागले. नांदगांवकर यांनी ग्राहकांकडे चौकशी केली असता मालक प्रजापती काहीही न सांगता निघून गेल्याची माहिती मिळाली. हे समजताच नांदगांवकरांचे धाबे दणाणले. त्यांच्याप्रमाणेच आणखी काही जणांनी प्रजापती यांच्याकडे दागिने गहाण ठेवले होते. कफ परेड पोलिसांत प्रजापती यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.