जळगाव : आजारी वडीलांना भेटण्यासाठी नाशिक येथे गेलेल्या कांचन मधुकर कदम यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण २ लाख ६१ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना भगीरथ कॉलनीतील वक्रतुण्ड अपार्टमेंटमध्ये घडली असून याप्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
भगीरथ कॉलनी येथील वक्रतुण्ड अपार्टमेंटमध्ये कांचन कदम या कुटूंबासह वास्तव्यास असून त्या एलआयसी कार्यालयात सहाय्यक असिस्टंट म्हणून नोकरीला आहेत. त्यांचे आई-वडील नाशिक येथे राहयला असून वडीलांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे ६ एप्रिल रोजी त्या आजारी वडीलांना पाहण्यासाठी नाशिक येथे गेल्या होत्या. त्यानंतर वडीलांना उपचारार्थ दुस-या रूग्णालयात हलविणे असल्यामुळे कांचन यांनी त्यांचे पती यांना १४ एप्रिल रोजी नाशिकला बोलवून घेतले. त्यामुळे त्यांचे फ्लॅट कुलूप बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी १४ ते १६ एप्रिलच्या दरम्यानात बंद फ्लॅट फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविली.
लाईट होता सुरू...अन् घरात प्रवेश करताच...सोमवारी सकाळी ड्युटी असल्यामुळे कांचन कदम या रविवारी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास घरी पोहोचल्या. त्यांना अपार्टमेंटच्या बाहेरूनच त्यांच्या फ्लॅटचा लाईट सुरू दिसला. फ्लॅटजवळ दरवाजा कुलूप दिसून आला नाही. फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर कपाट उघडलेले आणि कपडे अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. तसेच टेबलावर ठेवलेले दागिने आणि देवघरामध्ये ठेवलेले पैसे चोरीला गेल्याचे दिसून आले. कांचन यांनी लागलीच ही घटना त्यांच्या पत्नी यांना कळविली. नंतर सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
असा आहे चोरी गेलेला ऐवज५२ हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत, १२ हजार रूपये किंमतीची मंगलपोत, १ लाख ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची गोफ तसेच ५ हजार रूपये किंमतीचे घड्याळ व १२ हजार रूपयांची रोकड असा एकूण २ लाख ६१ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.