मंगेश कराळे
नालासोपारा :- वसईत एका आरोपीकडे वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी विदेशी बनावटीचे पिस्तुल पकडले आहे. आरोपीकडून ४ जिवंत काडतुसे आणि १ रिकामी पुंगळी जप्त केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास खैरपाडा परिसरात एक आरोपी अग्नीशस्त्र खरेदी-व्रिकी करिता येणार असल्याची बातमीदाराकडून माहीती मिळाली होती. सदर माहीतीच्या सत्यतेबाबत शहानिशा करुन पुढील कायदेशिर कारवाई करण्यासाठी त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप व पथकास आदेश दिले. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने बातमीदाराच्या मदतीने आरोपी रमेशकुमार सत्यप्रकाश यादव (२५) याला सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक विदेशी पिस्तुल मॅगझीनसह, ४ जिवंत काडतुसे आणि १ गोळीबारा पश्चात उरलेली रिकामी पुंगळी असा एकुण ५४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हा विनापरवाना अग्निशस्ञ जवळ बाळगताना मिळुन आला. पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केला केल्याने आरोपी विरुध्द वालीव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त र्पोणिमा श्रींगी-चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सैय्यद जिलानी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हकालादर मुकेश पवार, मनोज मोरे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, सुनिल चव्हाण, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी केली आहे.