लोकमत न्यूज नेटवर्कनवीन पनवेल : पैशांच्या वादातून मासे कापण्याच्या सुऱ्याने मित्राचे शिर कापून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या शफिक अली हैदर या इसमाला पनवेल शहर पोलिसांनी उत्तर प्रदेशात जात असताना भोपाळ येथून अटक केली. २८ जून रोजी पनवेल येथील मोहम्मद अस्लम हाशमद (४२, राहणार आशियाना अपार्टमेंट, जुन्या कोर्टजवळ, पनवेल) हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली गेली होती. त्यानुसार पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, प्रमोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बजरंग राजपूत व त्यांचे पथक तयार केले होते. या हरवलेल्या व्यक्तीच्या शोधात मोबाइलचे सीडीआर व सीसीटीव्ही फूटेज यांचा तांत्रिक तपास पोलिसांनी केला.
तपासादरम्यान हरवलेल्या व्यक्तीला त्याचा मित्र शफिक हैदर याच्यासोबत शेवटचे पाहिले असल्याबाबत माहिती मिळाली. याच्याविषयी तपास केला असता तो वडघर पनवेल येथून त्याचा मोबाइल बंद करून मूळ गावी उत्तर प्रदेशात जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याला भोपाळ मध्य प्रदेश येथे रेल्वेत त्याला विचारपूस करण्यासाठी थांबवले. तपासात त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच मोहम्मद हशमद याच्याबरोबर पैशाच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा व शिवीगाळीचा राग मनात धरून त्याच्या मानेवर मासे कापण्याच्या सुऱ्याने वार करून त्याचे मुंडके धडावेगळे करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.
दोन ठिकाणी लावली मृतदेहाची विल्हेवाटखुनाचा पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याचे धड नायलॉनच्या गोणीत भरून प्रेत चिंचपाडा कळंबोली सर्विस रोडच्या डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला टाकून दिले, तर मुंडके करंजाडे येथील नाल्यात टाकल्याचे त्याने सांगितले. आरोपीने सांगितल्याप्रमाणे मयताचे धड आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.