सातारा: येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील विजय ओव्हाळ या फळविक्रेत्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी कोयत्याने आणि चाकूने सपासप वार केल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात फळ विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरात प्रतापसिंह नगर परिसरात गेल्या चार दिवसात ही तिसरी थरारक घटना घडली आहे. बॉम्बे रेस्टॉरंट येथे असलेल्या फळ विक्रेत्यांवर अनोळखी मारेकऱ्यांनी कोयता व चाकुने वार केला. अचानकपणे झालेल्या या हल्ल्यात फळ विक्रेता विजय ओव्हाळ हे गंभीर जखमी झाले. हल्ला केल्यानंतर मारेकरी तेथून पळून गेले. या घटनेनंतर बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सातारा शहर चे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप समोर आले नाही.