ठाणे - सोनसाखळीची जबरीने चोरी करणाऱ्या प्रतीक सितापराव ऊर्फ भावडया (२२) याच्यासह सहा जणांच्या टोळीला कोपरी पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सोमवारी दिली. या टोळीकडून चार लाख ८० हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
कोपरीतील चेंदणी कुंभारवाडा, या भागात ५ आॅगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरासमोरील रस्त्यावर दोन चोरट्यांनी एका वयोवृद्ध महिलेला धक्काबुक्की करीत तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पलायन केले होते. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यातील एक आरोपी राबोडी भागात लपल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनिषराजे पठाण, श्रीराम पाटील, ज्ञानेश्वर धोंडे आणि पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी आदींच्या पथकाने प्रतीक सितापराव याला ६ आॅगस्ट २०२२ रोजी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तेंव्हा त्याने त्याचा साथीदार रोहित चौबे (२७) याच्यासह हा जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यानुसार कोपरी पोलिसांनी तीन पथके तयार करुन रोहित चौबे यालाही ठाण्यातील तीनहात नाका येथून अटक केली.
यानंतर रोहित दिलेल्या माहितीच्या आधारे सागर वाघ, महेश वाघ या अन्य दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून कोपरीतील जबरी चोरीचे आठ गुन्हे उघड झाले आहे. त्यांनी वसीम मकानदार आणि पूर्णचंद्र मैती यांच्याकडे चोरीतील दागिने ठेवण्यास दिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांनी कोपरीमध्ये सहा आणि कळव्यात एक सोनसाखळी जबरी चोरीचा गुन्हा केला. तर वागळे इस्टेटमध्येही एक मोटारसायकल जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबूली दिली.
कोणाविरुद्ध किती गुन्हे-आरोपींपैकी प्रतिक उर्फ भावड्या याच्याविरुद्ध आठ, रोहित चौबे विरुद्ध १९, सागर वाघ - दहा, महेश वाघ- तीन तर वसिम आणि पूर्णाचंद्र या दोघांविरुद्ध प्रत्येकी तीन गुन्हे दाखल आहेत.