डोंबिवली - खातेधारकांच्या बँके खात्याची माहिती गोळा करून त्या माहीतीच्या आधारे बोगस चेक बनवून त्याद्वारे लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला विरार आणि मानपाडा पोलिसांनीअटक केली आहे. यातील तीन आरोपींना यापूर्वीच अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर चौघे आरोपींना 6 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी एका कंपनीच्या नावे 24 करोड रूपयांचा बोगस चेक तयार केला होता तेव्हा त्यांचे बिंग फुटल्याची माहीती पोलिस सूत्रांनी दिली.
याप्रकरणी ऑक्टोबर 2021 मध्ये मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी एका कंपनीच्या मालकीचा 24 करोड रूपयांचा बोगस चेक तयार करून तो कल्याण शीळ मार्गावरील एका बँकेत सादर केला होता. विशेष म्हणजे यावर असणाऱ्या सहया देखील तंतोतंत जुळत होत्या. परंतू चेकवर असलेली मोठी रक म आणि चेकवरील प्रिंटबाबत शंका आल्याने बँक मॅनेजरने मानपाडा पोलिसांना याची माहीती दिली. पोलिसांनी तत्काळ धाव घेत आरोपींना अटक केली.
हरीश्चंद्र कडव, नितीन शेलार आणि अशोक चौधरी अशी अटक आरोपींची नावे आहेत हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर उर्वरीत चार आरोपींना नुकतीच अटक करण्यात आल्याची माहीती मिळत आहे. दरम्यान यासंदर्भात मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान दोन दिवसात यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे पोलीस अधिका-यांकडून सांगण्यात आले
50 पेक्षा बोगस चेक बनविलेआरोपी हे टिम वर्कने काम करायचे यात खातेधारकांचे बँक डिटेल्स गोळा करणो. त्यामध्ये किती पैसे शिल्लक आहेत हे पाहणे, खातेधारकाच्या सहीचे फोटो वगैरे माहीती घ्यायचे. त्यानंतर या माहीतीच्या आधारे बोगस चेक बनविण्याचे काम करायचे. एक साधा चेक घेऊन त्यावरील खाता नंबर खोडून, नवीन खाता नंबर प्रिंट केला नाई. जमविलेल्या माहीतीच्या आधारे मग त्यावर डुप्लिकेट सही केली जात असे. हा चेक वापरून एका बँक खात्यातून दुस-या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जायचे. पैसे ट्रान्सफर करून घेण्यासाठी देखील बोगस खातेदाराचा वापर केला जात होता. अशा प्रकारे संबंधित आरोपींनी 50 पेक्षा जास्त बोगस चेक बनविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहीती समोर येत आहे.