मंगेश कराळे, नालासोपारा: गावठी कट्टा ट्रेलर चालकाला दाखवून लाखो रुपये किंमतीच्या सळईने भरलेला ट्रेलर पळवून नेणाऱ्या चार दरोडेखोरांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी अटक केली आहे. या आरोपींकडून चोरी केलेल्या लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करून दोन अग्निशस्त्र, एक जिवंत काडतुस आणि गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.
वज्रेश्वरी शिरसाड रोडवरील पारोळ नाका येथे शनिवारी पहाटे गावठी कट्टा ट्रेलर चालकाला दाखवून लाखो रुपये किंमतीच्या सळईने भरलेला ट्रेलर चार दरोडेखोरांनी जबरी चोरी करून चोरून नेला होता. चालक राजकुमार सिंग (५५) हे ट्रेलरमध्ये १७ लाख २० हजार रुपये किंमतीच्या २७ टन लोखंडी सळई व ३७० किलो एम एस बेडिंग लोखंडी वायर असे भरून अंबाडी ते मुंबई येथे जाण्यासाठी वज्रेश्वरी शिरसाड रोडने जात होते. त्याचवेळी चार दरोडेखोरांनी एका चार चाकी वाहनाने त्यांचा ट्रेलर रस्त्यात अडवून एकाने गावठी कट्टा चालकाला दाखवला. त्यांना मारहाण करून जबरदस्तीने मोबाईल खिशातून काढून ड्राईव्हरच्या मागील सीटवर झोपवून तोंडावर कापड टाकून ट्रेलर आरोपीने चालवून चालकाला विरार फाटा येथे उतरून ट्रेलर घेऊन आरोपी पळून गेले होते. घडलेली सर्व कहाणी चालक राजकुमार सिंग यांनी पेल्हार पोलिसांना सांगून ४२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार देत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना सदर दरोडेखोर शिरसाड हायवेवर येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून पळून जाताना पोलिसांनी पाठलाग करत ३६ तासांच्या आत चारही दरोडेखोरांना अटक केली आहे. नौशाद अहमद (२४), मोहम्मद समीर कुरेशी (२१), मेहताब अली (२९) आणि मोहम्मद दानिश खान (२०) अशी पकडलेल्या चारही दरोडेखोरांची नावे आहेत. या आरोपींवर हत्या, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
"चारही दरोडेखोर हे गुजरात राज्यातील असून यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना पुढील तपास व चौकशीसाठी मांडवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चारही आरोपींना १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे", असे प्रमोद बडाख (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ३) यांनी सांगितले.