विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : कानळदा रोडवरील गजानन नगरात राहणाऱ्या कुटुंबाच्या घरावर दगडफेक करीत कुटुंबातील तीन जणांना मारहाण करून दुखापत करण्यात आली. ही घटना शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक किसन ठोसर (५७, रा. गजानन नगर, कानळदा रोड) हे शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी रात्री घराबाहेर आले. त्यावेळी त्यांच्या घराच्या मागे राहणाऱ्या चार जणांनी काहीही कारण नसताना ठोसर यांच्या घरासमोर येत मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ केली. त्यानंतर चौघांनी अशोक ठोसर यांच्यासह मुलगा किरण आणि मुलगी आश्विनी यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. यात किरण याला लाकडी दांड्याने मारहाण केली तर अश्विनीच्या डोक्यात कुंडी मारून फेकली. तर अनोळखी १० ते १२ जणांनी त्यांच्या घरावर दगडफेक करून साहित्याचे नुकसान केले. याप्रकरणी अशोक ठोसर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गजानन नगरातील चार जणांसह अनोळखी १० ते १२ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.