उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं सामूहिक बलात्कार प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. इथं ७ जणांविरोधात नव्हे तर २३ आरोपींविरोधात गँगरेपचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील ६ आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. या घटनेतील पीडितेच्या आईनं साजिद, दानिश आणि राज अशी तिघांनी नावे घेत माझ्या मुलीवर अत्याचार केल्याचं म्हटलं आहे.
लालपूरच्या हुकुलगंज परिसरातील ही घटना आहे. याठिकाणी राहणाऱ्या १९ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी ६ जणांना अटक केली आहे. २३ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून १२ आरोपींसह ११ अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये दानिश, साजिद, इमरान, राज खान, अनमोल, जाहिर, अमन, जैब, राज, समीर सोहैल, आयुष या आरोपींचा समावेश आहे. ६ आरोपी अटकेत आहे तर १७ फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके नेमली आहेत.
पीडितेच्या आईने आरोप केलाय की, हे सर्व आरोपी माझ्या मुलीला वेश्या व्यवसायात ओढत होते, हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांसोबत बळजबरीने मसाज करायला लावायचे. २९ मार्च रोजी माझी मुलगी तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. तिथून परतताना वाटेत राज खान भेटला. त्याने तिला कॅफेला नेले आणि रात्रभर तिच्यावर अत्याचार केले. ३० मार्चला समीर आणि त्याच्या मित्रांनी मुलीला वाटेत पकडले. दोघांनी तिला बळजबरीने बाईकवर घेऊन गेले आणि हायवेवरच तिचं लैंगिक शोषण करून नदेसर इथे सोडून दिले असं तिची आई म्हणाली.
त्यानंतर १ एप्रिलला साजिद त्याच्या मित्रांसोबत माझ्या मुलीला भेटला. त्यांनी माझ्या मुलीला हॉटेलला नेले, तिथे आधीच ३ जण हजर होते. हॉटेलमध्ये मुलीला एका ग्राहकाचा मसाज करण्यास सांगितले. त्यावेळी त्या अज्ञाताने मुलीवर अत्याचार केले. हॉटेलच्या बाहेर इमरान भेटला त्यानेही तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. यासारखे अनेकजणांनी माझ्या मुलीवर पाळीपाळीने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेच्या आईने तक्रारीत केला आहे.