बाराबंकी - रात्री ८ च्या सुमारास १६ वर्षीय मुलगी शौचासाठी घराजवळील शेतात गेली होती. घरात आई एकटीच होती. मुलगी परतली नाही त्यामुळे आई शेताकडे टॉर्च घेऊन शोधायला गेली तेव्हा शेतात ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. एका युवकाने तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मुलीला त्या अवस्थेत घरी आणले परंतु या घटनेचा धसका घेऊन मुलीने विष प्यायलं. हॉस्पिटल, उपचार, औषधे, पोलीस स्टेशन यात ३ दिवस उलटले. अखेर मुलीची मृत्यूसोबत सुरू असलेला संघर्ष थांबला. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रविवारी संध्याकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली. घरात आई आणि मुलगी होती. दोन भाऊ कामानिमित्त बाहेर राहत होते तर वडील ड्यूटीला गेले होते. मोठी बहीण होती जिचं पाच महिन्यापूर्वी लग्न झाले. मुलीने आईला शौचास जाऊन येते असं सांगून बाहेर पडली. घरात शौचालय नव्हते त्यामुळे रात्रीच्या वेळीही अंधारात शेताकडे जावे लागायचे. अर्धा तास झाला तरी मुलगी घरी परतली नाही. तेव्हा आईची चिंता वाढली. ती टॉर्च घेऊन शेताकडे गेली तेव्हा मुलीची अवस्था पाहून ती हादरली.
अंधारात शेतात मुलगी जमिनीवर पडली होती. तिच्या गळ्याभोवती ओढणी होती. सलमान नावाचा मुलगा मुलीच्या अंगावर होता. तो मुलीच्या घराशेजारीच राहतो. ६ महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले. आईला पाहताच सलमानने तिथून पळ काढला. त्यावेळी काय करायचं हे आईला कळाले नाही. तिने मुलीला उचलले आणि घरी आणले. मुलीचे सगळे कपडे फाटले होते. शरीरावर जखमा होत्या. मुलगी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. २ तासांनी तिने आईला जे काही घडले ते सगळे सांगितले. पीडित मुलीचे वडील पोलीस शिपाई होते. गावात त्यांची खूप इज्जत आहे. त्यांच्या मुलीची अब्रू लुटली गेली हे कळाले तर वडील जिवंत असूनही मरतील. या घटनेचा धसका घेतलेल्या मुलीने विष पिऊन आत्महत्या केली.
या घटनेबाबत पोलीस तक्रार झाली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. मुलीचे वडील आणि भाऊ म्हणाले की, अनेक वर्षापासून घरी शौचालय बनवण्याची चर्चा होती. सरपंचाकडून मागणी व्हायची तेव्हा घराबाहेर शौचालयासाठी भिंत उभारली पण सीट बसवली नाही. जर वेळीच सरपंचाचे ऐकले असते, घराबाहेर शौचालय बनवले असते तर आज मुलीला शेतात जाण्याची वेळ आली नसती. ती आज जिवंत असती असं सांगताना वडिलांच्या डोळ्यातून पाणी आले.