सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या एका मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. जवळपास वर्षभर ही मुलगी सरकारी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होती. मुलीचा हा कारनामा पाहून पोलिसांना धक्का बसला तर रुग्णालयात प्रशासनात खळबळ माजली आहे. घडलेला प्रकार उघडकीस आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ही मुलगी केवळ १० वी पास आहे. मात्र बनावट कागदपत्रांच्या आधारे तिने डॉक्टरकीचं प्रमाणपत्र बनवलं होते. त्यामुळे हे प्रकार समोर येताच या मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण तुर्कीचं आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, या मुलीचं नाव आयसे ओजकिराज असं आहे. ती राजधानी इस्तांबुलपासून १०० किमी अंतरावर असलेल्या एका शासकीय रुग्णालयात काम करत होती. २० वर्षीय ओजकिराज मागील १ वर्षापासून हॉस्पिटलमध्ये चाइल्ड स्पेशालिस्ट म्हणून रुग्णांवर उपचार करायची.
मात्र अलीकडेच ओजकिराजच्या सहकाऱ्यांना तिच्यावर संशय आला. त्यांनी ओजकिराजची चौकशी केली तेव्हा जे सत्य समोर आले त्याने सहकारी शॉक झाले. ओजकिराजकडे वैद्यकीय शिक्षणाचं कुठलेही प्रमाणपत्र नाही. ती बोगस डॉक्टर म्हणून रुग्णालयात काम करत होती. त्यानंतर तिच्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. परंतु २० वर्षीय ओजकिराजनं दावा केला की, मी इस्तांबुल विश्वविद्यापीठातून CAPA मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलंय. पोलिसांनी तिच्या शिक्षणाची आणि कॉलेजची चौकशी केली असता त्यात विरोधाभास आढळला.
पोलिसांनी तपासासाठी हॉस्पिटलच्या लोकांना बोलावलं होतं. त्यानंतर ओजकिराजच्या घराची झडती घेतली. तेव्हा तपासात अनेक बनावट ओळखपत्रे, प्रमाणपत्रे तिच्याकडे आढळले. त्यात मेडिकल डिग्रीचं सर्टिफिकेट होते. पोलिसांनी हे सगळं जप्त केले. केवळ १० वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ओजकिराजनं जबाबात सांगितले की, मी जेव्हा १० वीत होते तेव्हा घरच्यांना वाटायचं मुलीने मेडिकल शिक्षण घेतले पाहिजे. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. मला चांगले मार्क मिळतील असं वाटले. पण मी परीक्षेत नापास झाले. त्यामुळे बनावट कागदपत्रे तयार करून मी कुटुंबाला दाखवलं जेणेकरून घरात कुणी काही बोलणार नाही अशी कबुली तिने पोलिसांना दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"