- संजय शहाणे
नाशिक : पोलिसांना आव्हान देत चेन स्नॅचर्सकडून तीन दिवसांत दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केल्याच्या घटना घडल्या. यामुळे महिलांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी (दि.२९) दुकानात पायी जात असलेल्या महिलेच्या हनुवटीला जोरदार फटका मारून तिच्या गळ्यातील ६६हजार रूपयांचे मंगळसुत्र हिसकावून दुचाकीस्वार चोरटे फरार झाले.
पाथर्डी फाटा येथील विक्रीकर भवन परिसरातील रस्त्यावरून शनिवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास फिर्यादी अलका श्रीराम देवरे (५७,रा. पाथर्डी फाटा) कापडाच्या दुकानात कपडे घेण्यासाठी पायी जात होत्या. यावेळी त्यांच्यासमोरून भरधाव राखाडी रंगाची दुचाकीने आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोराने उजव्या हाताने देवरे यांच्या हनउटीला फटका मारला. यावेळी गडबडलेल्या अवस्थेत बघून त्याने त्यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून धूम ठोकली.
या घटनेनंतर परिसरात देवरे यांनी आरडाओरड केल्याने नागरिकांची गर्दी जमा झाली; मात्र चोरटे सुसाट पळून गेले. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळविले. काही वेळेत पोलिसांचे गस्ती पथक घटनास्थळी आले; मात्र चोरटे तोपर्यंत फरार झाले होते. पोलिसांनी देवरे यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला सोनसाखळी चोरांनी खुले आव्हान दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
बुधवारी वृद्धेला केले होते ‘टार्गेट’चेतनानगर परिसरातील एक वृद्धा आपल्या नातवासह औषध घेण्यासाठी मेडिकलमध्ये पायी जात होत्या. यावेळी दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून धूम ठोकली होती. चेनस्नॅचर्सची ही जोडगोळीने परिसरात धुमाकूळ घातला आहे. तीन दिवसांत दुसरी घटना अशाचप्रकारे घडल्यामुळे परिसरातील महिलांनी पोलिसांच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पादचारी महिलांना चोराकंडून लक्ष्य केले जात असताना गस्तीपथकाच्या हाती चोरटे कसे लागत नाही? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.