बंगळुरू: शहरातील एका एआय कंपनीच्या सीईओ महिलेने आपल्या केवळ चार वर्षीय मुलाच्या हत्येचा कट रचला होता. या कटाचा भाग म्हणून ३९ वर्षीय सूचना मुलाला घेऊन गोव्याला आली आणि तिथे हॉटेलच्या खोलीत त्याचा खून केला, असा संशय असल्याचे गोवा पोलिसांनी सांगितले. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीतून कफ सिरपच्या दोन रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हत्येपूर्वी सूचनाने आपल्या मुलाला कफ सिरपचा हेवी डोस दिला असावा, असा पोलिसांना संशय आहे. सूचनाने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून कफ सिरपची बाटली मागवली होती. त्याला खोकला असल्याचे सूचनाने सांगितले होते.
मुलाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे. कर्नाटकातील हिरीयुर सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर कुमार नाईक यांनी सांगितले की, मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. उशी किंवा टॉवेलने गळा दाबल्यासारखे वाटते. हाताचा वापर केला नाही. मुलाचा चेहरा आणि छाती सुजली होती. त्याच्या नाकातूनही रक्त वाहत होते. पोस्टमॉर्टमच्या ३६ तास आधी मुलाचा मृत्यू झाला.
खून केल्याचे कोणतेही दु:ख चेहऱ्यावर नाही
४ वर्षांच्या मुलावर बुधवारी बंगळुरू येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी मुलाचा मृतदेह चित्रदुर्ग येथून येथील अपार्टमेंटमध्ये आणला होता, जिथे प्राथमिक विधी पार पडले. नंतर मुलाचे वडील व्यंकट रमण यांनी अंत्यसंस्कार केले. खून केल्याचे कोणतेही दु:ख महिलेच्या चेहऱ्यावर नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सूचनाचा १०० प्रभावी महिलांमध्ये समावेश
सूचना सेठ ‘द माइंडफुल एआय लॅब’ची सीईओ आहे आणि तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती एक एआय नीतिशास्त्र तज्ज्ञ आणि डेटा सायंटिस्ट आहे. ती एआय एथिक्स लिस्टमधील १०० प्रभावी महिलांमध्ये आहे.
तिला हवी होती महिना अडीच लाखांची पोटगी
- सूचना सेठ हिने आपले पती पी. आर. व्यंकट रमण याच्याकडून दर महिना अडीच लाख रुपये पोटगी मिळावी, अशी मागणी केली होती. पतीचे वार्षिक उत्पन्न १ कोटी रुपये असल्याचा दावा तिने केला होता. माझा व मुलाचा पतीने शारीरिक छळ केला, असा आरोपही तिने केला होता.
- सूचनाने आपल्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा नोंदविला होता. त्याकरिता पुरावा म्हणून तिने व्हॉट्सॲप संदेश तसेच काही छायाचित्रे व वैद्यकीय अहवाल न्यायालयाला सादर केले होते. तिने आपल्या मुलाची हत्या केली, त्यावेळी व्यंकट रमण हे इंडिनेशियात होते. ते आपल्या मुलाला दर रविवारी भेटत असत. ते सूचनाला अजिबात आवडत नव्हते.