'‘महिलेचे कपडे उत्तेजक असल्यास लैंगिक छळाचा आरोप करता येणार नाही’'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 07:33 AM2022-08-18T07:33:44+5:302022-08-18T07:33:52+5:30
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते व लेखक सिव्हिक चंद्रन (७४ वर्षे) यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
तिरुवनंतपुरम : महिलेने लैंगिक भावना उत्तेजित करणारे कपडे परिधान केले असतील तर अशा प्रकरणात एखाद्यावर लैंगिक छळाचा आरोप प्रथमदर्शनी करता येणार नाही, असा निकाल एका प्रकरणात केरळच्यान्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते व लेखक सिव्हिक चंद्रन (७४ वर्षे) यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
कोडिकोळ येथील जिल्हा सत्र न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याचा आरोपीचा हेतू होता हे सिद्ध व्हायला हवे, असे भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४मध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे. सिव्हिक चंद्रन यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात १२ ऑगस्ट रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला. विनयभंग करण्याचा सिव्हिक चंद्रन यांचा हेतू होता असे भारतीय दंड संहितेच्या ३५४(ए) कलमातील तरतुदींनुसार प्रथमदर्शनी म्हणता येत नाही.
महिला तक्रारदाराची काही छायाचित्रे चंद्रन यांनी न्यायालयाला सादर केली. आणखी एका लैंगिक छळाच्या प्रकरणात चंद्रन यांना २ ऑगस्ट रोजी अटकपूर्व जामीन मिळाला होता. महिलेच्या छायाचित्रांचा संदर्भ देत कोडिकोळ जिल्हा न्यायालयाने म्हटले आहे की, तक्रारदार महिलेने परिधान केलेले कपडे लैंगिक भावनांना उत्तेजन देणारे होते. त्यामुळे या महिलेचा विनयभंग करण्याचा सिव्हिक चंद्रन यांचा हेतू होता, असे प्रथमदर्शनी म्हणता येणार नाही. आरोपीने महिलेला स्पर्श केला असेल किंवा लैंगिक सुखाच्या हेतूने काही कृती, संभाषण केले असेल तरच त्याचा विनयभंग करण्याचा हेतू होता असे म्हणता येईल. (वृत्तसंस्था)
खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा
आपल्या विरोधात महिलेने खोटी तक्रार दाखल केली आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्ते सिव्हिक चंद्रन यांनी न्यायालयात केला होता. एका समारंभात पीडित महिला माझ्याशी बोलायला आली होती. त्यावेळी तिथे अनेक जण उपस्थित होते. इतर कोणीही माझ्यावर लैंगिक छळाचा आरोप केला नाही. फक्त या महिलेनेच तसा आरोप केला असा युक्तिवाद सिव्हिक चंद्रन यांच्या वतीने वकिलांनी केला.