नवी मुंबई : मजुराला असलेल्या दारूच्या सवईवरून त्याला सतत बोलून दारू सोडण्याचा तगादा लावणे व्यापाऱ्याला जीवावर बेतले आहे. १४ ऑगस्टला एपीएमसी भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी घटनेनंतर बेपत्ता असलेल्या मजुराला अटक केल्यानंतरच या हत्येचे कारण समोर आले.
एपीएमसीच्या भाजी मार्केटमध्ये भाड्याच्या गाळ्यावर व्यापार करणाऱ्या रमायन ललसा उर्फ गुरुदेव (४५) या व्यापाऱ्याच्या हत्येची घटना रविवारी उघडकीस आली होती. गाळ्याच्या वरच्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा बंद असून व्यापाऱ्यांचा संपर्क होत नसल्याने दरवाजा तोडला असता आतमध्ये मृत्यदेह आढळून आला होता. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू असताना त्याच्याकडे मजुरी करणारा अरुणकुमार भारती (३२) हा बेपत्ता असल्याचे आढळून आले. यामुळे त्याच्या शोधासाठी सहायक आयुक्त डी. डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक माणिक नलावडे यांनी सहायक निरीक्षक वसीम शेख, निलेश शेवाळे आदींचे पथक तयार केले. तपासादरम्यान मयत रमायन यांचे दोन मोबाईल देखील चोरीला गेले असल्याचे समोर आले. त्याद्वारे तपास पथकाने चार दिवसांत उत्तर प्रदेशसह नवी मुंबईत शोध घेऊन गुरुवारी रात्री अटक केली.
अधिक चौकशीत त्याने मयत रमायन हे दारू सोडण्यावरून सतत लोकांमध्ये बोलत असल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली दिल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. अरुणकुमार याला दारूचे व्यसन असल्याने रमायन हे त्याला सतत दारू सोडण्यासाठी बोलत असत. परंतु लोकांसमोर त्यांचे बोलणे अरुणकुमार याला खटकत असे. यारून शनिवारी रात्री दोघेच असताना त्यांच्यात वाद झाला. त्यामध्ये अरुणकुमार याने पेव्हरब्लॉक डोक्यात मारून रमायन यांची हत्या करून पळ काढला होता.