औरंगाबाद : चुकीच्या मार्गाने एक कोटी रुपयांची विदेशी दारु घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कचनेर ते करमाड मार्गावर शनिवारी रात्री पकडला आहे. ट्रक चालकावर गुन्हा नोंदवित ट्रकसह विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती निरीक्षक ए.जे. कुरेशी यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभागाचे निरीक्षक कुरेशी हे पथकासह महामार्ग पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब नागवे यांच्यासमवेत कचनेर ते करमाड रस्त्यावर संयुक्तपणे वाहनांची तपासणी करीत होते. तेव्हा या रस्त्यावर ट्रकची (एमएच १७ बीवाय ५१६६) तपासणी केली. तेव्हा ट्रकमधुन १ हजार ६८ विदेशी मद्याच्या बॉक्सची वाहतुक करण्यात येत होती. ट्रकचालक फरीद लालाभाई पठाण (५७, रा. चेंबूर, मुंबई) यास याविषयी विचारपुस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या विदेशी मद्याचा वाहतूक परवाना दिंडोरी-धुळे-जळगाव-नागपूर असा असताना ट्रक चालकाने चुकीच्या मार्गाने कचनेर फाट्याजवळ बिडकीन-कचनेर-करमाड रोडने काद्राबाद शिवारात वाहतूक करताना आढळला आहे. या ट्रकमध्ये अतिशय महागड्या ब्रॅण्डची विदेशी मद्य असल्याचेही ट्रकच्या तपासणी स्पष्ट झाले. या प्रकरणी ट्रकचालक फरीद पठाण याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कामगिरी अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक कुरेशी, दुय्यम निरीक्षक ए.जे.दौंड, जी.एस.पवार, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे पाटील, जवान विजय मकरंद, ज्ञानेश्वर सांबारे, अनिल जायभाये, महामार्गचे उपनिरीक्षक काकासाहेब नागवे,दुय्यम निरीक्षक जर्नादन राठोड, रामनाथ चव्हाण यांच्या पथकाने केली.