गडचिराेली : शेतशिवारात स्वमालकीची गुरे चारत असताना दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करीत शेतकऱ्याला ठार केल्याची घटना गुरूवार २२ सप्टेंबर राेजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तालुक्यातील दिभना जंगल परिसरात घडली. हे वनक्षेत्र एफडीसीएम कंपार्टमेंट नं १ मध्ये येते.
नामदेव गेडाम (६५) रा. जेप्रा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नामदेव गेडाम हे नेहमीप्रमाणे स्वमालकीची गुरे चारण्यासाठी दिभना जंगल परिसरात काही गुराख्यांसोबत गेले हाेते. जंगलालगत गुरे चारत असताना दुपारी १२ वाजताच्या सुमारास वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घेतली व त्यांना फरफटत जंगलात नेले. याबाबतची चाहूल जवळच्या लाेकांना लागताच त्यांनी आरडाओरड केली; परंतु कुणाचेच काही चालले नाही. घटना स्थळापासून १ ते दीड किमी अंतरावर वाघाने गेडाम यांना फरफट नेले.
शेवटी वाघाने नामदेव गेडाम यांचा बळी घेतला. घाबरलेल्या सोबत्यांनी याबाबतची माहिती सुरूवातीला गावात त्यानंतर वनविभागाला दिली. वन कर्मचारी व गावकऱ्यांनी जंगलात सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवली. शेवटी गेडाम यांचा मृतदेह सापडला. वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रात्री ९ वाजतापर्यंत मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणी व विच्छेदनासाठी पाठविला.