जळगाव: रूग्णालयात उपचारार्थ दाखल मुलीसाठी जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या महिलेवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी सिताराम अभिमन कोळी (४६, रा. डांभूर्णी, ता. यावल) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस.सापटनेकर यांनी सोमवारी सहा महिने सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सुरेखा सोनवणे या १४ ऑक्टोंबर २०१५ रोजी रूग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल मुलीला जेवणाचा डबा घेऊन रिक्षाने जात होत्या. अचानक रिक्षामध्ये महिलेच्या मुलीचे चुलत सासरे सिताराम कोळी हे बसले. त्यांनी पिशवितून चाकू काढून महिलेवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून १५ ऑक्टोंबर २०१५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि. ३०७, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
७ साक्षीदार तपासलेहा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस.सापटनेकर यांच्या न्यायालयासमोर चालला. त्यात सरकारपक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी जखमी महिला, डॉ. आसिफ शेख, तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन बागुल व इतर साक्षीदार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सोमवारी न्यायालयाने साक्षीपुराव्याअंती आरोपी सिताराम कोळी याला भादंवि. ३२४ खाली दोषी धरून ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा देखील सुनावली आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता प्रदीप महाजन यांनी कामकाज पाहिले.