- हनुमान जगतापमलकापूर- घरात घुसून तोडफोड व मारहाण करून विवाहित महिला व तिच्या भावाचे अपहरण केल्याची घटना येथील अशोकनगरात गुरुवारी रात्री घडली. त्यात मलकापूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.शहरातील अशोकनगरातील रहिवासी गजानन ठोसर यांनी बँकेत नोकरी लावून देतो, म्हणून घेतलेली रक्कम परत घेण्यासाठी काहीजण वारंवार त्यांच्या घरी आले. परंतु, त्यांना पैसे न मिळाल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गुरुवारी सायंकाळी अशोकनगरात काहीजण ठोसर यांच्या घरी पोहचले. त्यांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली. मग त्यानंतर घरातील साहित्याची तोडफोड करून घरातील व्यक्तींना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी गजानन ठोसर यांच्या पत्नी रूपाली गजानन ठोसर व त्यांचा भाऊ शिवम श्रीनाथ अशा दोघांनाही जबरीने सोबत घेऊन गेले. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
याप्रकरणी अपहरण झालेल्या विवाहित महिलेच्या भगिनी वैशाली रवि रत्नपारखी यांनी मलकापूर शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध संगनमताने घरात घुसून तोडफोड व मारहाण त्याचबरोबर अपहरणाचा गुन्हा दाखल केला.याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रामावतार रघुनाथ लोधी, शिवलनगर भुसावळ व मुन्ना विरसींह जमरे (रा.हेलपाडावा चौपाले, जि.खरगोन) या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दि. ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
याप्रकरणी घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रतनसिंह बोराडे करीत आहेत, तर शहर पोलिसांचे एक पथक सहायक पोलिस निरीक्षक बालाजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या बाहेरगावी रवाना झाले आहे.