लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पतीच्या घरातील वडिलोपार्जित ५५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून प्रियकरासोबत पळून गेलेल्या विवाहितेला त्याच्या प्रियकरासह ठाणे शहर पोलिसांनी तब्बल सहा वर्षांनी अटक केली. दोघांनी दागिन्यांची विक्री करून कोणास संशय येऊ नये, यासाठी गोकर्ण (कर्नाटक), गोवा, चिपळूण, रत्नागिरी, तळोजा या भागात अस्तित्व बदलून मुक्काम ठोकला होता.
तसेच बदललेल्या नावाचे गॅझेट प्रसिद्ध करून त्याद्वारे पॅनकार्ड, आधार कार्ड बनवून वेगवेगळ्या ठिकाणी ते वास्तव्य करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मंगेश संतोष मंगरशी याने स्वतःचे नाव मयंक केशव लांजेकर आणि विवाहिता ज्योती मंगेश पाटील हिने तिचे नाव उन्नती मयंक लांजेकर असे बदलून त्याचे गॅझेट प्रसिद्ध करून त्याद्वारे पॅनकार्ड, आधार कार्ड बनविल्याची कबुली त्यांनी दिली. ठाणे पोलिस आयुक्तालयातील कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे फिर्यादी यांच्या पत्नीचे, घरासमोर राहणाऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते.