दयानंद पाईकराव, नागपूर: चारित्र्यावर संशय घेऊन आईशी भांडण करून तिला शिविगाळ करीत असलेल्या वडिलांवर १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने चाकुने वार केल्याची घटना ७ मार्चला रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यात उपचारादरम्यान जखमी वडिलांचा मृत्यू झाला असून कळमना पोलिसांनी आई आणि मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रताप नामदेव कुळमेथे (४०, प्लॉट नं. ३९, शनि मंदिराच्या मागे, बजरंगनगर कळमना) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर चंदा प्रताप कुळमेथे (३५) आणि १७ वर्षाचा विधी संघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावे आहेत. ७ मार्चला रात्री ९ वाजता प्रताप हा चंदाच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत वाद घालत होता. पती-पत्नी एकमेकांना शिविगाळ करीत असताना प्रतापने भाजी कापण्याचा चाकु घेऊन चंदाला मारण्यासाठी धावला असता चंदाने चाकु ओढल्याने तिच्या हाताला मार लागला. ती ओरडल्यामुळे बाजुच्या खोलीत असलेला तिचा १७ वर्षाचा अल्पवयीन मुलगा मदतीसाठी धावला. वडिलांच्या रोजच्या भांडणामुळे रागाच्या भरात त्यांनी प्रतापच्या हातातून चाकु हिसकला.
त्यानंतर विधीसंघर्षग्रस्त बालकाने वडिल प्रतापच्या पोटावर ३ आणि छातीवर एक वार करून त्यास गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी प्रतापला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले. तेथे प्रताप हा दारु पिण्याच्या सवयीचा असल्याचे सांगून अंगणात पडून जखमी झाल्याची माहिती दिली. मेयो रुग्णालयात वॉर्ड क्रमांक ३१ मध्ये अतिदक्षता कक्षात उपचार सुरु असताना १५ मार्चला सायंकाळी ५.४५ वाजता डॉक्टरांनी प्रतापला तपासून मृत घोषित केले. कळमनाचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल तांबे यांनी वैद्यकीय अहवालावरून प्रतापला ठार मारल्याचे निष्पन्न झाल्यामुळे प्रतापची पत्नी चंदा आणि विधी संघर्षग्रस्त बालकाविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, २०१, २०२, २०३, २१२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.