लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगावात १३ वर्षीय मुलावर गेल्या पाच महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत त्याचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी ६ अल्पवयीन मुलांवर वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना बालसुधारगृहात पाठविले आहे.
पीडिताच्या कुटुंबीयांनी सोमवारी रात्री पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मुलाच्या काकाला व्हॉट्सॲपवर एक व्हिडीओ मिळाला, ज्यामध्ये एका मुलावर हल्ला केला जात होता आणि पार्श्वभूमीच्या आवाजात इतर मुले हसत होती. हा व्हिडीओ पाहिल्यावर काकांकडून पीडिताला त्याबद्दल विचारल्यावर त्याने घडला प्रकार सांगितला, असे पोलीस म्हणाले. मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत आपल्यावर अत्याचार झाल्याचे पीडिताने उघड केले; परंतु त्याचे आई-वडील आणि नातेवाइकांसह कोणालाही याबाबत सांगण्यास तो घाबरत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सर्व आरोपी हे १५ ते १७ वयोगटातील असून ते केवळ मुलावर हल्ला करत नाही, तर गुन्हेगारी कृत्याचे चित्रीकरणदेखील करताना दिसत आहे.
व्हिडीओ फिरवले सोशल मीडियावर पोलिसांनी सांगितले की, पीडितावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करण्यात आले. ज्यात आरोपीच्या घराचा देखील समावेश आहे. ‘आरोपींनी या कृत्याचे परिणाम समजून न घेता ते व्हिडीओ व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘मजेसाठी’ फिरवले होते. पीडिताच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर, सर्व मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ते सध्या डोंगरी येथील बाल बंदी केंद्रात आहेत. पोलिसांनी आरोपींकडून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत, त्यांच्यावर भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.