नागपूर : बालिकेवर अतिप्रसंग करण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. या न्यायप्रविष्ट गुन्ह्याच्या तारखेवर हजर राहण्यासाठी तो कोर्टात आला. गावाकडे परत जाताना त्याची वक्रदृष्टी एका युवतीवर पडली अन् त्याने तिला निर्जन ठिकाणी रेल्वे कोचमध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिला मारहाण करून तिची रक्कमही बळजबरीने हिसकावून घेतली. विशेष म्हणजे, या गुन्ह्यातील पीडित युवतीने तब्बल सात दिवसांनंतर पोलिसांकडे तक्रार नोंदविली आणि कोणताही पुरावा नसताना रेल्वे पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या बांधल्या.
शेख मोहम्मद (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. एखाद्या सिरियलमधील कथानक वाटावे, अशी ही घटना २२ फेब्रुवारीची आहे. पीडित युवती सुनैना (नाव काल्पनिक, वय २१) गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात राहते. २२ फेब्रुवारीला ती मुख्य रेल्वे स्थानकावर आली होती. फलाट क्रमांक ४ वर आरोपी शेख मोहम्मदची नजर तिच्यावर पडली. ती एकटीच असल्याचे पाहून तो तिच्याजवळ गेला आणि तिला धाकदपट करू लागला. 'तेरे परिवारवाले आजकल बहोत जादा कंम्प्लेंट कर रहे है. उन्हे समझा दे, नही तो अंजाम बहोत बुरा होंगा', अशी धमकी त्याने सुनैनाला दिला. ती ऐकून सुनैना घाबरली.
कुटुंबियांनी तक्रार केली असावी, असे वाटल्याने तिने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने कंम्प्लेंट वापस लेने चल म्हणत तिला मुंबई लाईनच्या टोकावर नेले. तेथे उभी असलेल्या एका रेल्वेगाडीच्या रिकाम्या कोचमध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड करताच आरोपीने तिचा गळा दाबला आणि जबरदस्तीने तिच्या मोबाईलवरून आपल्या फोन पे वर चार हजार रुपये वळते केले. नंतर कुणाला काही सांगितले तर तुला आणि कुटुंबियांना ठार मारेन, अशी धमकी देऊन तिला फलाट क्रमांक आठवर सोडून पळून गेला. प्रचंड घाबरलेल्या सुनैनाने ही घटना तब्बल सात दिवसांनंतर आपल्या कुटुंबियांना आणि त्यानंतर रेल्वे पोलिसांना सांगितली. तिची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर रेल्वेचे पोलीस अधीक्षक अंकूश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मनीषा काशिद यांनी लगेच चाैकशी सुरू केली.
असा मिळाला धागाआरोपीने सुनैनाच्या मोबाईलमधून रक्कम वळती केली होती, त्या खात्याचे डिटेल्स, खातेधारकाचे नाव, संपर्क क्रमांक शोधला. तो धागा पकडत आरोपी नंदीग्राम (पश्चिम बंगाल)चा असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांचे एक पथक तिकडे रवाना केले. या पथकाने आरोपी शेख मोहम्मदच्या मुसक्या बांधून त्याला सोमवारी नागपुरात आणले. सुनैनासमोर उभे करताच तिने त्याची ओळख पटविली. त्याला आज न्यायालयात हजर करून त्याचा तीन दिवसांचा पीसीआर मिळवला. ठाणेदार काशिद यांच्या नेतृत्वात एपीआय कवीकांत चाैधरी तसेच रेल्वेचे पोलीस कर्मचारी सुनील घुरडे, पटले, मिश्रा, प्रवीण खवसे, अमोल हिंगणे, सुशांत वासनिक आदींनी ही कामगिरी बजावली.
आधीचे पाप, त्यात पुन्हा भरआरोपीचा मेव्हणा नागपुरात मोलमजुरी करतो. २०२१ मध्ये मेव्हण्याकडे आला असताना येथे त्याने एका बालिकेशी कुकर्म करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लकडगंज पोलिसांनी त्याला पोक्सो कायद्यानुसार अटक केली होती. कारागृहातून जामिनावर बाहेर येताच तो मुळगावी नंदीग्रामला गेला. या गुन्ह्याची तारिख असल्याने २२ फेब्रुवारीला तो येथे न्यायालयात आला होता. तारिख घेतल्यानंतर गावाला परत जाण्यासाठी तो रेल्वेस्थानकावर आला. येथे एकटी सुनैना त्याच्या नजरेस पडली आणि त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. गुन्हा केल्यानंतर तो मुळगावी पळून गेला. आपल्यापर्यंत पोलीस पोहचू शकणार नाही, असा त्याचा होरा होता. मात्र, ठाणेदार मनीषा काशिद यांनी रेल्वे स्थानकावरचे सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचे बँक खाते अन् त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढून त्याला अटक करण्यात यश मिळवले.