नवी दिल्ली-
दिल्लीत एक सिक्युरिटी एजन्सी चालवणारा व्यक्ती सायबर फ्रॉडचा शिकार झाला आहे. हॅकर्सनं त्याच्या बँक खात्यातून ५० लाख रुपये एका झटक्यात उडवले आहेत. पीडित व्यक्तीच्या दाव्यानुसार त्यानं आपला OTP नंबरही कुणाशी शेअर केला नव्हता. तरीही त्याच्या खात्यातून लाखो रुपये लंपास करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं गुन्ह्याची नोंद करुन चौकशीला सुरुवात केली आहे.
पीडिताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार १३ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी नंबरवरुन फोन आला. ते फोन उचलायचे पण समोरुन कुणीच बोलायचं नाही. त्यानंतर वारंवार त्याच नंबरवरुन मिस कॉल येऊ लागले. यात त्यांनी दोन-तीन वेळा फोन उचलला पण समोरुन कुणीच बोलत नव्हतं. जवळपास १ तास हे सुरूच होतं. काही वेळानंतर एक SMS आला आणि तो पाहून डोळेच फिरले. कारण त्यांच्या अकाऊंटमधून ५० लाख रुपये लाटण्यात आले होते.
डीसीपी सायबर सेलच्या माहितीनुसार तक्रारदार व्यक्तीला OTP प्राप्त झाला होता. पण त्यांचा मोबाइल हॅक झालेला असल्यामुळे तो हॅकरकडून वापरला गेला आणि तक्रारदाराला ते कळलंच नाही. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हेगारांना पकडण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत.
नुकतंच दिल्लीच्या द्वारका परिसरात सायबर गुन्हेगारांनी एका प्राध्यपकाला लक्ष्य केलं होतं. त्यांच्या कॅनरा बँक अकाऊंटमधून ६,२५,०७४ रुपये लाटण्यात आले होते. त्यांनी तातडीनं एनसीआरपी हेल्पलाइन नंबरवर कॉल करुन याची तक्रार नोंदवली होती.