गाझियाबादच्या शहीद नगर येथून ३० वर्षापूर्वी गायब झालेला युवक राजू पुन्हा त्याच्या घरी परतला आहे. राजू गायब होण्यामागचं कारण ऐकून अनेकजण हैराण झालेत. सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. ३० वर्षापूर्वी शाळेतून परतताना काही लोकांनी माझं अपहरण केल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला आहे. पोलिसांनी त्याच्या कहाणीवर विश्वास ठेवून त्याला एका कुटुंबाच्या स्वाधीन केले मात्र आता पोलिसांसमोर वेगळेच सत्य आले आहे. या युवकाने देहारादून येथेही असाच प्रकार केला होता.
तपासात राजू हीच कहाणी बनवून देहारादून येथील एका कुटुंबात मोनू म्हणून राहत होता. जुलैमध्ये तो देहारादून पोलिसांकडे पोहचला आणि त्याने त्याच्या अपहरणाची कहाणी सांगितली. तो देहारादूनचा राहणारा होता, लहानपणी त्याचे अपहरण करून काही लोकांनी राजस्थानला नेले होते. त्याठिकाणी मजूर म्हणून काम करायला लावले. त्याची ही कहाणी खरी मानून देहारादूनच्या पटेलनगरमध्ये राहणाऱ्या आशा देवी शर्मा यांनी त्याला त्यांचा गायब झालेला मुलगा म्हणून घरी आश्रयास ठेवले होते.
देहारादूनहून काही महिन्यापूर्वी दिल्लीत आला
आशादेवीचे पती कपिलदेव शर्मा यांनी सांगितले की, घरी परतल्यापासून मोनू कायम त्यांच्या मुलांशी भांडण करायचा. त्यांना घरातून बाहेर जायला सांगायचा. मला नेहमी त्याच्या दाव्यावर संशय यायचा परंतु पत्नीमुळे मी त्याला घरात राहू दिले होते असं त्यांनी सांगितले. इथं काही महिने शर्मा कुटुंबासोबत राहिल्यानंतर मोनू दिल्लीत काम करण्यासाठी जातो सांगून घरातून गेला. त्यानंतर गाजियाबादला इथं पोलिसांना येऊन तीच कहाणी ऐकवत तुलाराम यांच्या घरी राहू लागला. देहारादून पोलिसांकडून मिळालेल्या सूचनेनंतर गाझियाबाद पोलिसांनी राजूला तपासासाठी ताब्यात घेतले.
सध्या या प्रकरणाचा देहारादून आणि गाझियाबाद पोलीस संयुक्त तपास करत आहे. राजू साहिबाबादचा ज्या कुटुंबात राहत होता, त्यातील तुलाराम यांनी सांगितले की, गाझियाबाद पोलिसांनी तपासासाठी राजूला सोबत नेले आहे. पोलीस तपासानंतर खरं काय ते समोर येईल त्यानंतर कुटुंब म्हणून निर्णय घेऊ. आता २ दिवसच तो आमच्यासोबत राहिला आहे. या २ दिवसांत त्याची वागणूक विचित्र होती. दिवसभर तो घरी ठीक राहायचा आणि रात्री बाहेर जायचा हट्ट धरायचा.
दरम्यान, राजूने त्याच्या अपहरणाची आणि सुटकेची अतिशय भावनिक कहाणी सांगितली होती. त्याला जैसलमेरमध्ये ठेवण्यात आले होते, जिथे त्याला बकऱ्या पाळायचं काम दिले होते. बकरी घेण्यासाठी एकदा काही ड्रायव्हर आले होते. तेव्हा त्याने त्याच्या पायातील साखळी पाहिली, आणि त्याला कारण विचारले तेव्हा त्याच्या अपहरणाची कहाणी सांगितली. यानंतर ट्रकचालकांनी राजूला दिल्लीला आणले. तिथून राजूने खोडा पोलीस ठाणे गाठले आणि ही कहाणी सांगितली. पोलिसांना ३० वर्षांपूर्वीच्या नोंदी तपासल्या त्यावरून तुलारामचा मुलगा बेपत्ता झाल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी राजूल त्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले पण आता कहाणीत ट्विस्ट आला आहे.