नितीन पंडित
भिवंडी :दि.९- भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम फोफावत असताना त्यास संरक्षण देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या अर्थपूर्ण संबंधांवर नेहमीच टीका होत असताना भिवंडी महानगरपालिकेच्या बिट निरीक्षकास अनधिकृत बांधकामास संरक्षण देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केल्या प्रकरणी बुधवारी सायंकाळी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत एकास अटक केली आहे. रमाकांत म्हात्रे असे अटक पालिका प्रभाग समिती क्रमांक तीनच्या बिट निरीक्षकाचे नाव आहे . भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक तीन येथील एका अनधिकृत बांधकामास संरक्षण देण्यासाठी प्रत्येक स्लॅब नुसार पन्नास हजार रुपयांची मागणी बिट निरीक्षक रमाकांत म्हात्रे यांनी १३ ऑक्टोबर रोजी केली होती,व सदर रक्कम त्रयस्थ व्यक्ती कडून स्वीकारण्याचे मान्य केले होते.या बाबत फिर्यादी यांनी ठाणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली असता तक्रारीची शहानिशा करीत बुधवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक तीन कार्यालयात कारवाई करीत रमाकांत म्हात्रे यास ताब्यात घेत अटक केली आहे .लाचलुचपत विभागाच्या या कारवाईने भिवंडी महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामास संरक्षण देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यात खळबळ माजली आहे.