Crime News : दिल्ली-वाराणसी राष्ट्रीय महामार्गावर एका ४० वर्षीय महिलेचा निर्वस्त्र मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शीर गायब असून, महिलेसोबत नेमके काय घडले, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेने कानपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मयत महिला कोण आणि हत्या झाली की अपघात, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (११ सप्टेंबर) सकाळी ६.१५ वाजता महामार्गावर महिलेचा मृतदेह पडलेला असल्याचे आढळून आले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.
पोलीस उपायुक्त रवींद्र कुमार यांनी सांगितले की, अशी शक्यता आहे की, महिलेचा मृत्यू रस्ते अपघातात झाला असावा. स्थानिक पोलीस, फॉरेन्सिक टीमचे तज्ज्ञ घटनास्थळी गेले. घटनास्थळावरून महिलेचे दात आणि काही हाडांचे तुकडे आढळले असून, ते ताब्यात घेण्यात आले आहेत.
अपघातात मृत्यू झाल्याच्या शक्यतेवर प्रश्न
महिलेचा अपघातात मृत्यू झाला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महिलेवर बलात्कार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलेच्या अंगावरील कपडे पूर्णपणे फाटलेले आहेत. त्याचबरोबर महिलेचे शीर गायब आहे. अपघात झाला, तर शीर कुठे? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी सांगितले की, पोस्टमार्टेम रिपोर्टची प्रतिक्षा करत आहोत. त्यानंतर महिलेचा मृत्यू कसा झाला आणि काय घडले, हे स्पष्ट होईल. कदाचित गाडी गेल्याने शीर चिरडले गेले असावे. या सगळ्या गोष्टींचा तपास केला जात आहे.
अखिलेश यादवांचे गंभीर आरोप
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पोस्ट करत घटनेबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. "कानपूरमध्ये महिलेचा शीर नसलेला आणि निर्वस्त्र मृतदेह आढळला आहे. मयत महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचे पुरावे मिळाले आहेत. या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास केला जावा. आरोपींना अशी शिक्षा व्हायला हवी की पीडितेला न्याय मिळेल", असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. एका फुटेजमध्ये घटनास्थळापासून ३ किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयातून एक महिला बाहेर पडताना दिसत आहे. या महिलेची शरीरयष्टी आढळून आलेल्या मृतदेहासारखीच आहे. त्याबरोबर महिलेने ग्रे रंगाचे ट्राऊजर घातलेले आहे. आढळून आलेल्या मृतदेहाजवळही ग्रे रंगाच्या कपड्याचे तुकडे आढळून आले आहेत.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. महिला कोण होती आणि तिचा मृत्यू कसा झाला? मृतदेहाचे शीर कुठे आहे, याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.