Goa Murder Case ( Marathi News ) : गोव्यात झालेल्या लहान मुलाच्या हत्याकांडाप्रकरणी दिवसागणिक नवनवी माहिती समोर येत आहे. पोटच्या ४ वर्षीय मुलाला ठार करणाऱ्या सूचना सेठ या महिलेने लिहिलेली एक नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. सूचना हिने आयलाइनरने टिश्यू पेपरवर ही नोट लिहिली होती. या नोटमध्ये तिने आपला पती व्यंकटरमण याच्यासोबत असलेल्या तणावपूर्ण नात्याविषयी काही गोष्टी लिहिल्या असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले आहे.
सूचना हिने लिहिलेल्या चिठ्ठीत पतीच्या कुटुंबाकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच मुलाच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादाचा उल्लेखही त्यात आढळून आला आहे. कागदावरील लिखाण तसेच सूचनाच्या लिखाणाची पडताळणी केली जाणार आहे. पोलिसांकडून सध्या सूचनाची चौकशी सुरू आहे. मात्र चौकशीत ती सहकार्य करत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसंच मुलाच्या हत्येनंतरही तिच्या चेहऱ्यावर अजूनही पश्चातापाची भावना नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
मृतदेह असलेली बॅग उघडताच पोलिसांनाही बसला धक्का
गोव्यात मुलाची हत्या केल्यानंतर सूचना कॅबने प्रवास करत होती. कळंगुट पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार टॅक्सी चालकाने आयमंगला पोलिस स्थानकात येट गाडी नेली. मात्र, त्यावेळी सूचना शांतच गाडीत बसली होती. पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारणा करताच तिने स्वतःच चिन्मयचा मृतदेह असलेली बॅग पोलिसांसमोर खोलली, त्यामुळे सूचना हिच्या मानसिकतेचा पोलिसांनाही थांगपत्ता लागणे कठीण झालं आहे. मृतदेह बॅगमध्ये घालून जात असतानाच संपूर्ण प्रवासात सूचना शांतच होती. आयमंगला पोलिसांनी बॅगमध्ये काय आहे, असे विचारल्यावर कपडे असल्याचे तिने सांगितले; परंतु बॅग खोलण्यास सांगितली तेव्हा मात्र तिने शांतपणे बॅग पोलिसांच्या पुढे खोलली. त्यात मुलाचा मृतदेह पाहून तेथील सर्वांना धक्का बसला तरी ती शांतच राहिली होती.
दरम्यान, या खून प्रकरणात सूचनाला पकडण्यास टॅक्सीचालक रॉय ऑनची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. सूचनाला काहीच पत्ता लागू, न देता तो कळंगुट पोलिसांच्या संपर्कात होता, या प्रकरणाची गुरता त्याने इतकी पाळली की बाजूला बसलेल्या त्याच्या सहकारी चालकालाही याबद्दल काहीच समजले नाही.