मुंबई - दमण परिसरातील दादरा नगर हवेली येथे प्लॉट स्वस्तात खरेदी करून देण्याचे आमिष दाखवत वांद्र्यातील भाभा रुग्णालयाचे मालक महेशचंद्र मेहता (६३) यांना जवळपास १ कोटी २ लाखांचा चुना लावण्यात आला. याप्रकरणी त्यांनी वाकोला पोलिसात धाव घेत कुयाराम ऊर्फ खुशाल लालजी माळी याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीच्या रकमेपैकी ३६ लाख हे माळीने गुजरात सरकार मार्फत त्यांचा प्लॉट अधिग्रहण झालेल्या जागेचा मोबदला म्हणून मिळवल्याचा आरोप आहे.
मेहता यांची राजस्थानमधील एका कार्यक्रमात माळी याच्याशी ओळख झाली. त्यावेळी गप्पा मारता मारता त्याने तो प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार करत असल्याचे सांगितले. काही दिवसानंतर माळीने मेहता यांना फोन करत दादरा नगर हवेली या ठिकाणी ४ ते ५ स्क्वेअर फुटची हायवे लगत जागा असून, ती खरेदी करण्याची विनंती केली. त्यानुसार मेहता वापीला गेले आणि त्यांनी सदर प्लॉट पाहिला. त्यांना तो प्लॉट आवडल्याने ४० लाखात तो मिळवून देण्याचे माळी याने सांगितले. त्यानंतर चेक तसेच एनइएफटी मार्फत संबंधित रक्कम त्यांनी माळीला दिली. मात्र, जागा नावावर झाल्याचे कागदपत्र त्याने मेहता यांना न देता मालकाच्या सोयीने ते करून घेऊ असे सांगितले.
मोबदलाही लाटला
२०१८ मध्ये माळीने फोन करत प्लॉटमधील काही भाग सेलवास-वापी रोडच्या रुंदीकरणासाठी जाणार असून, त्याचा मोबदला मिळेल असे सांगितले. तेव्हा मेहता संबंधित ठिकाणी गेले तेव्हा प्लॉटमध्ये गुजरात सरकारमार्फत मोजणी केलेल्या खुणा दिसल्या आणि अन्य जमीन धारकांकडूनही जमीन अधिग्रहणाचे पैसे मोबदला म्हणून मिळणार असल्याचे समजल्याने त्यांना याबाबत खात्री पटली. तेव्हा उर्वरित प्लॉटवर कंपाउंड घालून अन्य सुविधा करण्यासाठी पुन्हा १७ जानेवारी २०१९ रोजी मेहता यांनी आरटीजीएस मार्फत २५ लाख पाठवले. त्यानुसार ६६ लाख रुपये माळीला प्राप्त झाले. या पैशाचा वापर करून त्याने तो प्लॉट स्वतःच्या नावावर खरेदी केला. तसेच गुजरात सरकारमार्फत मिळालेला मोबदला ३६ लाख रुपयेही लाटले.