लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: काशीमीरा पोलीस ठाण्याच्या समोर १३ ऑक्टोबर रोजी एका केक दुकानात घुसून कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखणाऱ्या व गोळी झाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोरास काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराचा शोध सुरु आहे.
इंटरनॅशनल बेकरी नावाच्या दुकानात हेल्मेट घालून शिरलेल्या हल्लेखोराने पिस्तूल कर्मचारी चंद्रकांत कोंडगुले ( २७ ) यांच्यावर रोखले . त्याने तीनवेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण गोळी काही सुटली नाही. त्यामुळे तो बाहेर पडला व दुचाकीवरून त्याच्या साथीदारासह पसार झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.तर इब्राहिम यासिन पटेल उर्फ बाबू यांचे हे दुकान असून त्यांच्या व्यावसायिक वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक आयुक्त महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम, पोलीस निरीक्षक समीर शेख, सहायक निरीक्षक योगेश काळे सह अन्य पोलीस तपास करत होते . आरोपी दुचाकीवरून निलकमल नाका कडून दुकाना जवळ आले आणि गोळी झाडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्यावर मुंबईच्या दिशेने पळून गेल्याचे तपासात समोर आले .
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सह तांत्रिक विश्लेषण व माहितीच्या आधारे पिस्तूल रोखणारा हल्लेखोर याला सोमवारी रात्री अटक केली . अकबर अली मोहम्मद शाफिक शेख ( २८ ) रा. संत रोहिदास चाळ, पिवळा बंगला, धारावी असे अटक आरोपीचे नाव आहे . हल्ल्यासाठी वापरलेली दुचाकी, पिस्तूल तसेच दुचाकी वरील साथीदार याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी अकबर शेख ह्याला ठाणे न्यायालयाने २० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . त्याच्यावर हत्येचा प्रयत्न आदी सारखे अन्य गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले . हल्ल्याचा प्रयत्न मागचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसून त्याचा तपास केला जात आहे .