इंदूर – मध्य प्रदेशातील बहुचर्चित भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी इंदूर कोर्टानं तिघांना दोषी ठरवलं आहे. शुक्रवारी कोर्टानं केअरटेकर पलक पुराणिक, मुख्य सेवादार विनायक आणि शरद यांना सहा वर्षाची कोठडी सुनावली आहे. या तिघांना २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. परंतु कुठलेही ठोस पुरावे नसल्याने आरोप सिद्ध करणं मोठं आव्हान बनलं होतं. या प्रकरणातील सुरुवातीच्या तपास अधिकाऱ्यांनी हे आत्महत्या प्रकरण मानून रिपोर्ट सादर केला होता.
मात्र त्याच दरम्यान एका अज्ञात फोन कॉलनं संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं. भय्यूजी महाराजांच्या मृत्यूसाठी दोषी असणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश झाला. इतकचं नाही तर या फोन कॉलमुळे भैय्यू महाराजांच्या जीवनातील असं रहस्य बाहेर पडलं जे कदाचित त्यांच्या मृत्यूनंतर कधीच जगासमोर आलं नसतं. हा फोन कॉल भय्यूजी महाराजांचे वकील निवेश बडजात्या यांना आला होता. निवेश बडजात्या मागील २२ वर्षापासून महाराजांचे निकटवर्तीय होते. फोनवरुन अज्ञात व्यक्तीने ५ कोटींची मागणी करत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली तेव्हा आरोपीचं नाव समोर येताच अधिकारीच चक्रावले. फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव कैलास पाटील असं होतं. जो भैय्यू महाराजांचा चालक होता. पोलिसांच्या तपासात कैलाशनं पलक, विनायक, शरद यांच्या तिघाडीचं गुपित बाहेर आलं. त्यानंतर भय्यूजी महाराज प्रकरणी एक-एक खुलासे समोर यायला लागले. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात आरोपी अलगद अडकले त्यामुळे त्यांना बचावासाठी काहीच पर्याय राहिला नाही.
कैलासनं पोलिसांना सांगितले की, पलक, विनायक आणि शरदनं भय्यूजी महाराजांच्या पैशांची हेराफेरी केली होती. भैय्यू महाराजांसह तो पलक, विनायकलाही गाडीत बसवायचा. या दोघांमधील होणाऱ्या संवादाबाबत कैलासनं पोलिसांना सांगितले. त्यावरुन तपासात धागेदोरे सापडले. त्यानंतर पोलिसांनी या तिघांची सखोल चौकशी केली तेव्हा त्यांनीच भैय्यू महाराजांना आत्महत्येसाठी उकसावलं होतं असं समोर आलं.
पाटीलनं या तिघांची पोलखोल केली. त्याचसोबत भय्यूजी महाराजांच्या आयुष्याशी निगडीत एक खुलासा केला. महाराज गाडीत बसून कायम मुलींशी संवाद साधायचे. त्यांचे बोलणं इंग्रजीत व्हायचे. महाराजांना वाटायचे पाटीलला इंग्रजी कळत नाही परंतु त्यांच्यासोबत राहून मला थोडीफार इंग्रजी येत होती. पाटील यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा महाराजांचे १२ मुलींसोबत संबंध असल्याचं समोर आलं. त्यातील दोन आयएएस अधिकारी होत्या. मुख्य सेवादार विनायक, शरद यांना ही कल्पना होती. याच माहितीच्या आधारे भय्यूजी महाराज यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन बनवला. त्यामुळे भय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.